Monsoon News : राज्यातील अनेक भागांत मान्सून सक्रीय, आता कुठे कोसळणार मुसळधार?

Monsoon and Rain in Maharashtra : राज्यात मान्सून सक्रीय झाला आहे. पुणे, मुंबई अन् विदर्भात मान्सून दाखल झाला आहे. मुंबईत पावसाने जोरदार बॅटींग केली. रविवारी राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागने व्यक्त केला आहे.

Monsoon News : राज्यातील अनेक भागांत मान्सून सक्रीय, आता कुठे कोसळणार मुसळधार?
mumbai rain start
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 25, 2023 | 8:58 AM

पुणे : राज्यात अनेक ठिकाणी मान्सून दाखल झाला आहे. विदर्भात मान्सून पोहचला असून अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे, मुंबईत शनिवारपासून जोरदार पाऊस झाला. पुणे शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. पुणे शहर आणि उपनगरात रविवारी देखील मुसळधार पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. शनिवारी दिवसभर झालेल्या पावसानंतर रात्री पावसाने विश्रांती घेतली होती. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्याच्या पूर्व भागातील शिंदोडी, चिंचणी, गुनाट, निमोणे, करडे परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली.

काय आहे आता अंदाज

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरु झाला आहे. कोकण, विदर्भ, मुंबई, पुणे भागात पाऊस होत आहे. मध्य महाराष्ट्र अन् मराठवाड्यात पाऊस आजपासून सक्रीय होणार आहे. पुढचे 5 दिवस मान्सून बहुतांश भागात सक्रिय होणार आहे. आता रविवारी कोकण अन् विदर्भात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच पुणे, सातारा, नाशिक जिल्ह्यामध्येही मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र अन् मराठवाडामध्ये पावसाचा अंदाज पुढील पाच दिवसांसाठी आहे.

पुणे जिल्ह्यात पाऊस

पुणे शहरासह जिल्ह्यात आज पुन्हा हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज आहे. पुणे शहरात झालेल्या पहिल्याच पावसाने हवेत गारवा निर्माण झाला. पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी संततधार पाऊस पडल्याने शिवारात पाणी साठले. शेतजमिनींना तळ्याचे स्वरुप आले आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे शेतीचे बांधही फुटले.
शिरुर तालुक्यातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून चातक पक्षासारखी आभाळाकडे डोळे लाऊन पावसाची वाट पहात होते. आता पाऊस झाल्याने शेतकरी आनंदीत झाले आहेत. रखडलेल्या मूग आणि बाजरीच्या पेरण्यांना आता वेग येणार आहे.

देशभरात पावसाचा अलर्ट

देशातील अनेक भागांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच उत्तर भारतासह झारखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड, आसाम, मेघालय आणि महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे.