
पुणे | 21 ऑगस्ट 2023 : यंदा मान्सूनचा घोळात घोळ सुरु आहे. दरवर्षी सात जून रोजी दाखल होणार मान्सून कोकणात ११ जून रोजी आला. त्यानंतर राज्यात अडखळला. अखेर २५ जून रोजी मान्सून दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागाने केली. त्यानंतर राज्यात जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. विदर्भ आणि कोकणात अतिवृष्टी झाली. अनेक गावांना पुराने वेढले. राज्यातील धरणांमध्ये समाधानकारक साठा होऊ लागला होता. मग अचानक ऑगस्ट महिन्यापासून पाऊस सुट्टीवर गेला. त्याची सुट्टी संपली असल्याची घोषणा हवामान विभागाने केली. दोन दिवस विदर्भात पाऊस झाला. पण आता पुन्हा टेन्शन वाढवणारी बातमी आलीय.
मान्सून संदर्भातील महत्वाची बातमी हवामान विभागाने दिली आहे. या बातमीमुळे पुन्हा शेतकऱ्यांचे आणि राज्यातील जनतेचे टेन्शन वाढले आहे. मान्सून आता उत्तरेकडे सरकला आहे. यामुळे सध्या राज्यात पावसाची कोणतीही परिस्थिती नाही. राज्यातील चार विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान विभागाच्या हवामान तज्ज्ञ शिल्पा आपटे यांनी व्यक्त केली आहे. आता 24 ऑगस्टनंतर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल. २१ ते २३ ऑगस्ट दरम्यान पुणे शहरातही तुरळक पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पुणे हवामान विभागाच्या हवामान तज्ज्ञ शिल्पा आपटे यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे सध्या पावसासाठी अजून काही काळ वाट पहावी लागणार आहे.
मान्सून यंदा सक्रीय झालाच नाही. जून महिन्यानंतर आता ऑगस्ट महिना कोरडा जात आहे. यामुळे मागील वर्षापेक्षा यंदा पेरणी कमी झाली आहे. राज्यातील धरणांमध्ये जलसाठा वाढला असला तरी मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे. यंदा पावसाची सरासरी कमी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत पावसाची तूट आहे. यामुळे यंदा अल निनोचा प्रभाव आहे की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.