PMPML : पीएमपीच्या तेराशे बसेस ब्रेकडाऊन! प्रवाशांच्या तक्रारीनंतर प्रशासनानं अखेर ठेकेदारांकडून वसूल केला दंड

| Updated on: Aug 17, 2022 | 9:40 AM

एकीकडे आधीच पीएमपी तोट्यात आहे. प्रवासी संख्या घटत आहे. अशावेळी आहे ते प्रवासी टिकवणे हे पीएमपीसमोर आव्हान आहे. अशात ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढले तर प्रवासी संख्येत उलट मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.

PMPML : पीएमपीच्या तेराशे बसेस ब्रेकडाऊन! प्रवाशांच्या तक्रारीनंतर प्रशासनानं अखेर ठेकेदारांकडून वसूल केला दंड
पीएमपीएमएल संग्रहित छायाचित्र
Image Credit source: Wiki
Follow us on

पुणे : पीएमपीएलएमच्या (PMPML) ताफ्यातील बस ब्रेकडाऊनच्या घटनांमध्ये मागील काही महिन्यामंध्ये वाढ झाली आहे. जुलै महिन्यात ठेकेदारांच्या तब्बल 1 हजार 318 बस ब्रेकडाऊन झाल्या आहेत. यावर विविध समाजमाध्यमातून टीका होत आहे. त्यानंतर पीएमपी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रशासनाने ठेकेदारामार्फत चालविल्या जाणाऱ्या बसवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाने एकाच महिन्यात ठेकेदाराकडून (Contractor) 16 लाख 63 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. पीएमपीकडे 1958 बस आहेत. त्यापैकी सुमारे 1500 ते 1550 बस दररोज विविध मार्गांवर धावत असतात. यातील 1156 बस या पीएमपीच्या मालकीच्या आहेत. तर 802 बस ठेकेदाराच्या मालकीच्या आहेत. ठेकेदाराच्या बसचे सर्वाधिक ब्रेकडाऊन (Breakdown) होत असल्याचे पीएमपीएमएल प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र आता कारवाई करण्यास सुरुवात केल्याचेही सांगण्यात आले आहे.

प्रवाशांना नाहक त्रास

एकीकडे आधीच पीएमपी तोट्यात आहे. प्रवासी संख्या घटत आहे. अशावेळी आहे ते प्रवासी टिकवणे हे पीएमपीसमोर आव्हान आहे. अशात ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढले तर प्रवासी संख्येत उलट मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. सततच्या ब्रेकडाऊनमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. शिवाय प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही मोठा प्रश्न निर्माण होतो. पीएमपी आणि ठेकेदार अशा दोघांच्या मिळून 1500 ते 1550 बस विविध मार्गांवर धावतात. त्यातील ठेकेदाराच्या 802 बसपैकीच सर्वाधिक ब्रेकडाऊन होतात, असे दिसून आले आहे.

हे सुद्धा वाचा

पीएमपी बसची प्रतिमा जनसामान्यांमध्ये होतेय मलिन

पीएमपी बसेसच्या ब्रेकडाऊनमुळे पीएमपी बसची प्रतिमा जनसामान्यांमध्ये मलिन होत आहे. यासंबंधी अनेक तक्रारीदेखील आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पीएमपी वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी दिली आहे. या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई तर होणारच आहे. त्यासोबत मेंटेनन्स सुधारण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. पीएमपी तोट्यात असल्याने आणि काही मार्गांवर प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असल्याने अलिकडेच जवळपास 25 मार्गांवरील सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पीएमपीला आपली सेवा सुधारणे क्रमप्राप्त आहे.