
पुणे | 7 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्र घेतल्यापासून पुणे शहरावर लक्ष केंद्रीत केले आहे. पुणे शहराच्या विकासासाठी ते सातत्याने बैठका घेत आहेत. अधिकाऱ्यांना रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश देत आहेत. पुणे मेट्रोच्या विस्तारासाठी प्रयत्न करत आहेत. पुणे शहरातील पुरंदर विमानतळ सुरु करण्यासाठी हालचालींना वेग दिला आहे. आता पुणे शहरातील उद्योजक आणि विद्यार्थ्यांना आनंद होईल, असा निर्णय अजित पवार यांनी जाहीर केला आहे.
पुणे शहरातील उद्योगांना हवे असणारे कुशल कर्मचारी निर्माण करण्यासाठी अजित पवार यांनी निर्णय घेतला आहे. पुणे शहरात दोन शासकीय आटीआय (Industrial Training Institutes) सुरु करण्याचा निर्णय अजित पवार यांनी जाहीर केला आहे. त्यातील एक आटीआय हवेलीत सुरु करण्यात येणार असून दुसरे येरवडा येथे सुरु करण्यात येणार आहे. या आयटीआयसाठी पाच एकर जागा आरक्षित करण्यात आली आहे. त्यात वर्गखोल्याशिवाय वर्कशॉप तयार केले जाणार आहे.
अजित पवार यांनी जिल्हाधिकारींना दोन्ही आटीआयच्या बिल्डींग बांधकामासाठी निधी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यंदाच्या वर्षाच्या आरखड्यात हा निधी मंजूर केला जाणार आहे. तसेच या दोन्ही आयटीआयमध्ये स्थानिक उद्योजकांच्या गरजेनुसार अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिले जाणार आहे. पारंपारीक अभ्यासक्रमाऐवजी रोबेटीक, सीएनसी मशीन यासारखे अभ्यासक्रमाची आखणी केली जाणार आहे.
येरवड्यात नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यासाठी २००८ मध्ये प्रशासकीय मान्यता दिली होती. परंतु त्यानंतर हा प्रकल्प रखडला होता. अजित पवार यांनी दोन्ही आयटीआयसाठी लागणारे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या जागा त्वरित भरण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे येत्या शैक्षणिक वर्षांपासून हे दोन्ही आयटीआय सुरु होणार आहे. पुणे जिल्ह्यात येरवडा आणि नगर रस्ता क्षेत्र, रांजणगाव, चाकण येथे एमआयडीसीचे महामंडळ आहे. याठिकाणी जगभरातील नामांकित उद्योग आहेत. यामुळे उद्योजक आणि विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.