Pune Ganeshotsav : हा गणेशोत्सव आहे खास! पुण्यातल्या मंडळांनी दिले पर्यावरण, वाहतूक अन् सामाजिक विषयाचे संदेश

गणेशोत्सव हे लोकांमध्ये त्यांच्या सामाजिक जबाबदाऱ्यांबद्दल सकारात्मक संदेश (Positive message) देण्यासाठीचे व्यासपीठ आहे, असे मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

Pune Ganeshotsav : हा गणेशोत्सव आहे खास! पुण्यातल्या मंडळांनी दिले पर्यावरण, वाहतूक अन् सामाजिक विषयाचे संदेश
पुण्यातील गणेशोत्सव
Image Credit source: tv9
| Updated on: Sep 06, 2022 | 3:19 PM

पुणे : पुण्यातील गणेश मंडळांनी (Pune Ganesh Mandals) विधायक कामांना प्राधान्य देत संदेश दिला आहे. शहरातील अनेक गणेश मंडळे सुरक्षित वाहतूक, पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि किल्ल्यांच्या संवर्धनाचे संदेश देत आहेत. गणेशोत्सव हे लोकांमध्ये त्यांच्या सामाजिक जबाबदाऱ्यांबद्दल सकारात्मक संदेश (Positive message) देण्यासाठीचे व्यासपीठ आहे, असे मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. रास्ता पेठ परिसरातील रवींद्र नाईक चौक मित्र मंडळाने सुरक्षित रस्ते आणि अतिवेग टाळण्याच्या संदेशावर भर दिला आहे. मंडळातील एक कार्यकर्ता म्हणाला, की वारंवार होणारे अपघात या पार्श्वभूमीवर रस्ता सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. हे लक्षात घेऊन यावर्षी रस्ता सुरक्षेवर (Road safety) थेट प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे. किरकटवाडी येथील नवतरूण मंडळाचे नरेंद्र हगवणे म्हणाले, की पर्यावरण संरक्षण ही यंदाची थीम आहे.

वनस्पतींची लागवड करण्याचा संदेश

आम्ही वनस्पतींच्या विविध जाती याठिकाणी दाखवल्या आहेत. या जातींची लागवड करून त्यांचे संगोपन केले जाणार आहेत. प्रत्येकाने अधिकाधिक झाडे लावून पर्यावरण रक्षणासाठी पावले उचलण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. अवयवदान, अंधश्रद्धेचे दुष्परिणाम आणि अन्नसुरक्षेचे महत्त्व याविषयीचे संदेशही मंडळे देत आहेत. जंगली महाराज रोडवरील शिवाजीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने किल्ले, टेकड्यांचे संरक्षण आणि सुरक्षित ट्रेकिंग या थीमवर देखावा सादर केला आहे.

किल्ल्यांच्या दुरवस्थेवर प्रकाश

पदाधिकारी प्रशांत बधे म्हणाले, की ऐतिहासिक किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे. या किल्ल्यांना मोठा इतिहास आहे. मात्र, किल्ल्यांवर लोक नियम-कायदे पाळत नाहीत. म्हणून आम्ही किल्ले, वनस्पती आणि जीवजंतू यांच्या संरक्षणाची थीम प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे, की कोणीही त्यांना अडथळा आणणार्‍या घटनांमध्ये सहभागी होऊ नये.

चिन्हमुक्त निवडणुकीचा देखावा

पौड रोडवरील अखिल भुसारी कॉलनी विकास मंडळाने दरवर्षी गणेशोत्सवात काहीतरी वेगळे सादर केले आहे. यंदा त्यांची थीम चिन्हमुक्त निवडणूक आहे. मंडळाचे अध्यक्ष सचिन धनकुडे म्हणाले, की लोकांनी चिन्हाच्या आधारे निवडून द्यावे, परंतु व्यक्तीचे चारित्र्य आणि त्यांनी समाजासाठी केलेले काम पाहून जनजागृती करणे हा आमचा उद्देश आहे.