पलटी झालेली गाडी वसंत मोरे यांनी दूर केली, म्हटलं ‘अंगात रग असली की कुठेही अन् कसेही भिडता येते…’

Vasant More : सामाजिक कार्यात कधी कोणाची वाट न पाहता स्वत: पुढाकर घेणारे मनसे नेते वसंत मोरे पुन्हा चर्चेत आले आहेत. रस्त्यावरील अपघातात पलटी झालेली गाडी त्यांनी स्वत: नागरिकांसह उचलून बाजूला केली.

पलटी झालेली गाडी वसंत मोरे यांनी दूर केली, म्हटलं अंगात रग असली की कुठेही अन् कसेही भिडता येते...
vasant more
| Updated on: Jun 09, 2023 | 6:21 PM

पुणे : मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) कोरोना काळातील कामगिरीमुळे चांगलेच चर्चेत आले होते. त्यांनी कोरोना रुग्णांचा योग्य उपचार आणि सोयी मिळाव्यात या मागणीसाठी हाती दंडुका घेत अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडल्या होत्या. तेव्हापासून वसंत मोरे पुणेकरांच्या हक्काचे आणि मर्जीतील व्यक्तीमत्व बनले. मग त्यानंतर कोणीही वसंत मोरे यांना फोन केला की त्याची मदत मिळतेच. आता वसंत मोरे आपल्या अजून एका कामामुळे लोकांच्या मनात घर करत आहेत. त्यांनी रस्त्यात अपघातामुळे पलटी झालेले वाहन नागरिकांच्या मदतीने उचलून बाजूला केले.

नेमके काय झाले

पुण्यातील कात्रज चौकात एका अपघातात चारचाकी वाहन पलटी झाले होते. पुलावर वाहन चालकाचा ताबा सुटला आणि कार पुलावरील पोलला धडकून भर रस्त्यात पलटी झाली होती. यामुळे कात्रज चौकात प्रचंड वाहतूक ठप्प झाली होती. या वेळी वसंत मोरे त्याच ठिकाणाहून जात होते. वसंत मोरे त्याच पुलाखालून जात होते. त्यावेळी वसंत मोरे यांना कोंढवा रोडचा कार्यकर्ता शेहबाज शेख याचा फोन आला. शेहबाजने त्यांना अपघाताची माहिती दिली.

मोरे यांनी केले आवाहन…अन् साथी हाथ बढ़ाना…

वसंत मोरे तत्काळ त्या ठिकाणी पोहचले. त्यांनी पाहिले की, गाडी रस्त्यात आडवी झाली होती, एकही गाडी जाऊ शकत नव्हती. मग वाहतूक पोलिसांना फोन करुन बोलवले असते, वाहतूक पोलिसांची क्रेन आली असती..त्यात खूप वेळ गेला असता. यामुळे वसंत मोरे यांनी क्षणाचाही विलंब ना करता रस्त्यावर असलेल्या तरुणांना आवाहन केले. मग क्षणाचाही विचार न करता अनेकांचे हात मदतीसाठी पुढे आले आणि चक्क ती गाडी उचलून दुभाजकावर ठेवली आणि मग ट्रॅफिक सुरळीत सुरु झाले. साथी हाथ बढ़ाना…म्हणत ही कामगिरी फत्ते झाली.

वसंत मोरे यांनी केले ट्विट

हा सर्व प्रसंग वसंत मोरे यांनी व्हिडिओसह ट्विट केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, अंगात रग असली ना की कुठेही आणि कसेही भिडता येते…वसंत मोरे यांचा हा व्हिडिओ सध्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रमवर व्हायरल होत आहे.

 

हे ही वाचा…

शव अर्धवट जळाले, मशीनचा फ्यूज उडाला, वसंत मोरे यांनी फोन केला अन्…