दिव्यांग व्यक्तींना मोफत बस पास, पुणे महापालिकेची योजना, वाचा सविस्तर

पुणे महानगरपालिकेच्या अपंग कल्याणकारी योजनेअंतर्गत अपंग व्यक्तींना प्रवासासाठी मोफत पास देण्याची सुविधा आहे. महापालिका हद्दीत रहिवाशी असणाऱ्या सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना या योजनेअंतर्गत प्रवासासाठी बसचा मोफत पास दिला जातो.

दिव्यांग व्यक्तींना मोफत बस पास, पुणे महापालिकेची योजना, वाचा सविस्तर
पुणे महापालिका

पुणे : केंद्र सरकार (Central Government) आणि राज्य सरकारकडून (Maharashtra Government) सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयोगी अशा विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. यासोबतच वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आपापल्या क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांसाठी स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना राबवत असतात. (Pune Municipal Corporation has a free pass scheme for disabled persons)

पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) आपल्या हद्दीतल्या नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे. यामध्ये विद्यार्थी, दिव्यांग, महिला, मुली, मागासवर्गीय, आदींसाठी शिक्षण, घर, शस्त्रक्रिया, पुनर्वसन आणि इतर बाबींसाठी शिष्यवृत्ती आणि अर्थसहय्य केलं जातं. अशा विविध योजनांची आपण ओळख करून घेणार आहोत.

अपंग कल्याणकारी योजना

पुणे महानगरपालिकेच्या अपंग कल्याणकारी योजनेअंतर्गत अपंग व्यक्तींना प्रवासासाठी मोफत पास देण्याची सुविधा आहे. महापालिका हद्दीत रहिवाशी असणाऱ्या सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना या योजनेअंतर्गत प्रवासासाठी बसचा मोफत पास दिला जातो.

काय आहेत अटी?

अपंग कल्याणकारी योजनेअंतर्गत बसचा मोफत पासचा लाभ घेण्यासाठी संबंधित अर्जदाराचं कुटुंब मागच्या तीन वर्षांपासून पुणे महापालिका हद्दीत वास्तव्यास असणं आवश्यक आहे. यासोबतच राज्य शासनाने ठरवून दिलेल्या टक्केवारी नुसार 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व (नि:समर्थ) असणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकेल.

दिनांक 01/05/2001 नंतर जन्माला आलेल्या आणि हयात अपत्यांमुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या दोनपेक्षा जास्त झाल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही. यासोबतच राज्य शासन वेळोवेळी जे बदल सुचवतील त्या प्रमाणात नियम आणि अटीत बदल करण्यात येईल.

काय कागदपत्रं लागणार?

अर्जदाराचं आधार कार्ड, कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान 3 वर्षे वास्तव्य असल्याचा दाखला. (रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत आवश्यक) तसेच 3 वर्षे वास्तव्य असलेल्या राहण्याचा पुरावा म्हणून गत 3 वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅन्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास / झोपडी सेवा शुल्क पावती / भाडे करारनामा इ. जोडावं लागणार आहे.

यासोबतच सर्व वयोगटातील अपंग (नि:समर्थ) व्यक्ती (वयाचा पुरावा म्हणून जन्मदाखला / ससून जनरल हॉस्पिटलमधील वयाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, मतदान यादीतील नाव अथवा मतदान ओळखपत्र यापैकी एक आवश्यक आहे.)

अपंगत्व सिद्ध करण्यासाठी मा. राज्य शासनाने ठरवून दिलेल्या टक्केवारीनुसार 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व (नि:समर्थ) असल्याचा दाखला. सोबतच पुणे महानगरपालिका अपंग स्मार्ट कार्ड असल्यास झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे.

कुठे सादर करणार अर्ज?

अपंग कल्याणकारी योजनेचा अर्ज जवळच्या महापालिका कार्यालयात समाज विकास विभागात सादर करायचा आहे. अर्ज सादर करताना मूळ कागदपत्र (original documents) सोबत आणण्याच्या सूचना महापालिकेकडून करण्यात आल्या आहेत.

अधिका माहितीसाठी 020-25501283 या क्रमांकारवर संपर्क साधा किंवा http://dbt.punecorporation.org या वेबसाईटला भेट द्या.

इतर बातम्या :

अनाथ, निराधार मुलांना पहिली ते पदवीपर्यंत शिष्यवृत्ती, पिंपरी चिंचवड महापालिकेची योजना, वाचा सविस्तर

रुफटॉप सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सरकारचं 40 टक्के अनुदान, महावितरण वीजही विकत घेणार, कसा कराल अर्ज?

पुण्यात ‘रेप क्रायसिस सेंटर’ची स्थापना, अत्याचारग्रस्त महिलांना मिळणार मानसिक आधार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI