पुण्यात कुर्ला बस अपघाताची पुनरावृ्त्ती; अनेक गाड्यांना चिरडलं, सीसीटीव्ही समोर

पुण्यातील चांदणी चौकात पीएमपीएमएल बसचे ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झाला. मुंबईतील कुर्ला अपघातासारखीच ही घटना आहे. दुचाकी आणि अन्य वाहनांना धडक दिल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे.

पुण्यात कुर्ला बस अपघाताची पुनरावृ्त्ती; अनेक गाड्यांना चिरडलं, सीसीटीव्ही समोर
pune bus accident
| Updated on: Apr 29, 2025 | 10:54 PM

पुण्यातील पीएमपीएमएल बसचा भीषण अपघात झाला. चांदणी चौकातून पुणे शहराच्या दिशेने येत असताना पीएमपीएमएल बसचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे मोठा अपघात घडला. या बसने ५ ते ६ दुचाकी, एक रिक्षा आणि काही अन्य वाहनांना धडक दिली. या अपघातात ४ जण जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेनंतर मुंबईतील कुर्ला अपघाताची पुनरावृत्ती झाल्याचे म्हटले जात आहे.

मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील एस. जी. बर्वे मार्गावर सोमवारी ९ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बेस्ट बसने अनेक गाड्यांना धडक दिली होती. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला. तर ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यानंतर आता पुण्यातील चांदणी चौकात पीएमपीएमएल बसचे ब्रेक फेल झाले आहेत. या बसने ५ ते ६ दुचाकी एक रिक्षा आणि काही अन्य वाहनांना धडक दिली. या अपघातात ४ ते ५ जण जखमी झाले.

ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात

हा अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही पीएमपीएमएल बस चांदणी चौकातून कोथरूडच्या दिशेने येत होती. ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने समोरच्या वाहनांना धडक दिली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

या घटनेमुळे चांदणी चौक परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर वाहतूक सुरळीत केली. सध्या बसच्या तांत्रिक बिघाडाची चौकशी सुरू आहे.

सीसीटीव्हीत नेमकं काय?

पुण्यातील एका दुकानाच्या बाहेरील सीसीटीव्हीत ही सर्व घटना कैद झाली आहे. या व्हिडीओत चांदणी चौक परिसर पाहायला मिळत आहे. त्यात एक निळ्या रंगाची पीएमपीएमएल बस आली. त्या बसने सुरुवातीला एका दुचाकीला धडक दिली. त्यानंतर पुढे येत त्या बसने आणखी दुचाकींना चिरडले. त्यासोबतच तिथे उभ्या असलेल्या रिक्षालाही बस धडकली. यानंतर ती बस शेजारी असलेल्या फुटपाथवर आदळली. यावेळी दुचाकीवर काही जण बसले होते. ते जखमी झाले आहेत. तर ही घटना घडत असताना आजूबाजूला असलेले नागरिक सैरावैरा पळताना दिसत आहेत.