Pune News : पुण्यात थरार, कोर्टाबाहेर गोळीबार, कोयत्याने हात कापले, एक ठार
Pune News : पुणे आज गोळीबाराच्या घटनेने हादरलं. पुणे शिवाजीनगर कोर्टाच्या गेट नंबर 4 बाहेर ही घटना घडली आहे. गोळीबारासोबत कोयत्याने सुद्धा हल्ला झाला.

पुण्यात आज एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. पुण्यात कायदा-सुव्यवस्था आहे का? असा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. कारण चक्क पुणे कोर्टाच्या परिसरातच गोळीबाराची घटना घडली. आरोपींनी कोर्ट परिसरात एका व्यक्तीवर गोळीबार केला. ती व्यक्ती स्वत:चा बचाव करुन पळत असताना कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. यात त्या पीडित व्यक्तीचे दोन हात शरीरापासून वेगळे झाले. ही खूप भयानक घटना आहे. पुणे शिवाजी नगर कोर्टाच्या बाहेर गेट नंबर 4 च्या परिसरात ही घटना घडली. ज्या व्यक्तीवर हल्ला झाला, त्याचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हल्ल्यात ठार झालेली व्यक्ती हत्येच्या प्रकरणातील साक्षीदार होती.
ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला, ती व्यक्ती पळत असताना त्याचा पाठलाग करुन कोयत्याने हल्ला करण्यात आला. शिवाजीनगर कोर्ट ते फॅमिली कोर्टाच्या परिसरात हे घडलं. आज सकाळीच सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोयता गँगची दहशत दिसली होती. कोयता गँग अस्तित्वात नाही असं पोलिसांकडून सांगितलं जातं. पण वास्तव मात्र तसं नाहीय. दिवसाढवळ्या अशा प्रकारचे हल्ले होत आहेत. पोलिसांचा गुंडांवर काही वचक राहिलाय की नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. शिवाजी नगर कोर्टाच्या गेट नंबर 4 च्या परिसरात नेहमी नागरिकांची वर्दळ असते अशा ठिकाणी हा हल्ला झाला.
गुंडांवर पोलिसांचा वचक किंवा काही धाक राहिलाय का?
पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरु आहे. गुंडांवर पोलिसांचा वचक किंवा काही धाक राहिलाय का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. घटनास्थळी बंदूक सापडली आहे. सहालोक या प्रकरणात असल्याची माहिती आहे. “कोयते हातात घेणारी अल्पवयीन मुलं वेगळी, आजची घटना ही गुन्हेगारीतून घडलेली आहे. आजची घटना ही टिपिकल गुन्हेगारी आहे. अजून मी सुद्धा माहिती घेतलेली नाही. कोर्टात तारीख असणार, त्याच्यावर पाळत ठेवली असणार. त्याने साक्ष देऊ नये म्हणून त्याला संपवण्यात आलं. ज्यांच्यावर वार झाले, त्यांच्याबद्दल माहिती मिळालेली नाही. ही टिपिकल गुन्हेगारी आहे. पोलीस यंत्रणा अंकुश ठेवण्यात कमी पडली आहे” असं रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.