Pre-Wedding Skin Care: लग्नाआधी चेहऱ्यावर आणायचंय नैसर्गिक ग्लो? घरीच बनवा हे खास मॉइश्चरायझर
Natural Moisturizer: लग्नाआधी त्वचा नितळ, मऊ आणि चमकदार दिसावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सऐवजी घरीच नैसर्गिक मॉइश्चरायझर तयार करून पाहू शकता. हे मॉइश्चरायझर बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घ्या.

लग्नाचा दिवस प्रत्येकासाठी खास असतो. या दिवशी आपला चेहरा नितळ, मऊ आणि चमकदार दिसावा, अशी मुलींसोबतच मुलांचीही इच्छा असते. त्यामुळे लग्नाच्या काही दिवस आधीपासूनच त्वचेची विशेष काळजी घेतली जाते. यासाठी अनेक जण महागड्या ब्युटी प्रोडक्ट्स आणि केमिकलयुक्त मॉइश्चरायझरचा वापर करतात. मात्र, त्यासाठी भरपूर पैसे खर्च करण्याची गरज नाही. घरात सहज उपलब्ध असलेल्या काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करून तुम्ही स्वतःच मॉइश्चरायझर तयार करू शकता. यामुळे त्वचेला ओलावा मिळण्यास आणि डागांची तीव्रता कमी होण्यास मदत होऊ शकते. चला तर मग, जाणून घेऊया हे नॅचरल मॉइश्चरायझर कसे बनवायचे.
नॅचरल मॉइश्चरायझर बनवण्यासाठी तुम्हाला या गोष्टींची गरज आहे – – २ चमचे ग्लिसरीन – २ चमचे एलोवेरा जेल – १ चमचा लिंबाचा रस – २ व्हिटॅमिन ई कॅप्सूल – एक चिमूटभर हळद
नॅचरल मॉइश्चरायझर बनवण्याची पद्धत
हे मॉइश्चरायझर तयार करण्यासाठी सर्वप्रथम एक स्वच्छ आणि कोरडे काचेचे एअरटाइट कंटेनर घ्या. त्यामध्ये थोडी हळद आणि लिंबाचा रस घालून दोन्ही पदार्थ चांगले एकत्र करा. त्यानंतर त्यात ग्लिसरीन आणि अॅलोव्हेरा जेल घालून पुन्हा व्यवस्थित मिक्स करा. आता व्हिटॅमिन ईच्या दोन कॅप्सूल फोडून त्यातील तेल या मिश्रणात टाका. सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत चांगले मिसळा. अशा प्रकारे तुमचे घरगुती मॉइश्चरायझर तयार होईल. हे मॉइश्चरायझर स्वच्छ एअरटाइट कंटेनरमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवू शकता. साधारण १५ ते २० दिवस त्याचा वापर करता येईल.
मॉइश्चरायझर कसे लावायचे?
जेव्हा तुम्ही फेसवॉशने चेहरा स्वच्छ कराल, तेव्हा त्वचा थोडी ओलसर असतानाच या मॉइश्चरायझरचा वापर करा. चेहरा आणि मानेवर थोडे मॉइश्चरायझर घेऊन हलक्या हाताने मसाज करा, जेणेकरून ते त्वचेवर व्यवस्थित पसरेल. याशिवाय रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करून हे मॉइश्चरायझर लावू शकता. नियमित वापर केल्यास त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास आणि त्वचा मऊ राहण्यास मदत होऊ शकते. मात्र, त्वचेतील बदल प्रत्येकाच्या त्वचेच्या प्रकारानुसार वेगवेगळे असू शकतात.
वापरताना ही काळजी घ्या
या मॉइश्चरायझरमध्ये लिंबाचा रस असल्याने सेंसेटिव्ह स्कीनवर जळजळ किंवा खाज येऊ शकते. त्यामुळे चेहऱ्यावर लावण्यापूर्वी हाताच्या आतील बाजूस थोडे मिश्रण लावून पॅच टेस्ट करा. जळजळ, लालसरपणा किंवा खाज जाणवल्यास त्याचा वापर करू नका. तसेच हे मॉइश्चरायझर लावल्याने डाग नक्कीच कमी होतील किंवा त्वचेचा रंग बदलेल, असे समजू नका.
