Google Travel Trends 2026: भारतात बदलतोय फिरण्याचा अंदाज; नवे ट्रॅव्हल ट्रेंड्स चर्चेत, गुगलच्या रिपोर्टमधून उघड
गुगल ट्रॅव्हल ट्रेंड्स २०२६ च्या अहवालातून भारतीयांच्या सुट्ट्यांशी संबंधित अशाच काही रंजक सवयी आणि बदलत्या प्रवासाच्या ट्रेंड्सचा खुलासा झाला आहे. जाणून घेऊया, या अहवालात नेमके काय म्हटले आहे.

गुगलच्या एका नव्या अहवालानुसार, २०२६ मध्ये भारतीयांच्या सुट्ट्या घालवण्याच्या सवयींमध्ये मोठा बदल झाला आहे. आता लोक केवळ फिरण्यासाठी किंवा आराम करण्यासाठीच नव्हे, तर स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठीही सुट्ट्यांचे नियोजन करत आहेत. अहवालानुसार, ‘वेलनेस ट्रॅव्हल इंडिया’ या विषयाच्या सर्चमध्ये तब्बल 1600 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावरून लोकांना अशा सुट्ट्या अधिक आवडू लागल्या आहेत, ज्यामध्ये सकाळी लवकर उठून व्यायाम करता येतो किंवा काही दिवस कोणाशीही फारसे न बोलता शांततेत वेळ घालवता येतो.
भारत योग आणि आयुर्वेदासाठी ओळखला जातोच; मात्र आता भारतीयही अशा वेलनेस व्हेकेशनमध्ये विशेष रस दाखवत आहेत. स्कायस्कॅनरच्या एका अहवालानुसार, 91 टक्के भारतीय प्रवाशांना वेलनेसवर लक्ष केंद्रित करणारे स्टे आवडतात.
आरोग्य आणि शांततेच्या शोधात
विशेष म्हणजे, केवळ स्पा ट्रीटमेंट किंवा मसाजसाठीच नव्हे, तर फिटनेस ट्रिपसाठीच्या सर्चमध्येही 950 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सुट्टीच्या काळात फिटनेसपासून दूर राहण्याऐवजी काही जण व्यायामालाही प्राधान्य देत आहेत. तर काहींना याच्या अगदी उलट अनुभव हवा आहे. कमी काम, कमी बोलणे आणि निवांतपणे वेळ घालवणे, अशी त्यांची अपेक्षा आहे. ‘सायलेंट रिट्रीट’साठीच्या सर्चमध्ये 150 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशा रिट्रीटमध्ये प्रामुख्याने ध्यानधारणा, मर्यादित संभाषण आणि शांत दिनचर्येचा समावेश असतो.
लपलेली ठिकाणे आणि छोट्या सहली
वेलनेससोबतच प्रवासाशी संबंधित इतरही काही ट्रेंड्स समोर आले आहेत. ‘हिडन जेम्स इंडिया’ या सर्चमध्ये 400 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या गर्दीपासून दूर असलेल्या आणि फारशा प्रसिद्ध नसलेल्या ठिकाणांना भेट देण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. ‘माझ्या जवळील हायकिंग ट्रेल्स’ आणि ‘म्युझिक फेस्टिव्हल ट्रॅव्हल’ या सर्च क्वेरींमध्येही वेगाने वाढ झाली आहे.
छोट्या सहलींनाही लोकांची पसंती मिळत आहे. गेल्या वर्षी ‘माझ्या जवळ एक दिवसाची सहल’ या सर्चमध्ये 130 टक्क्यांनी वाढ झाली. यामध्ये महाराष्ट्रातील लोकांनी देशभरात सर्वाधिक रस दाखवला. एकट्याने प्रवास करण्याची आवड अजूनही कायम असली, तरी भारतीयांना प्रवासादरम्यान एकटेपणा जाणवू नये, असेही वाटते. ‘ट्रॅव्हल कम्युनिटी’ या सर्चमध्ये 400 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावरून प्रवासादरम्यान समान आवडीनिवडी असलेल्या लोकांना भेटण्याची इच्छा वाढत असल्याचे दिसते.
एआयचा वाढता वापर
प्रवासाच्या नियोजनात आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचाही वापर वाढत आहे. ‘एआय फॉर ट्रॅव्हल’ या सर्चमध्ये 600 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गुगलचा हा अहवाल नव्या पिढीतील भारतीय प्रवाशांच्या बदलत्या आवडीनिवडी अधोरेखित करतो. काहींना प्रवासात साहस हवे आहे, तर काहींना शांतता अनुभवायची आहे. तर काही जण रोजच्या धावपळीच्या दिनचर्येतून थोडा वेळ स्वतःसाठी काढू इच्छितात. प्रत्येकाची प्रवासाची आवड आणि सुट्टी घालवण्याची पद्धत वेगळी असल्याचे या ट्रेंड्समधून दिसून येते.
