गणपती बाप्पा मोरया! गणेशोत्सवासाठी पुण्यातून धावणार एसटीच्या 118 ज्यादा गाड्या, सर्वाधिक गाड्या कोकणासाठी

| Updated on: Aug 30, 2021 | 2:54 PM

गर्दी टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने ज्यादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवासाठी तब्बल 118 अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहेत. यापैकी सर्वाधिक गाड्या या कोकणासाठी सोडल्या जातील.

गणपती बाप्पा मोरया! गणेशोत्सवासाठी पुण्यातून धावणार एसटीच्या 118 ज्यादा गाड्या, सर्वाधिक गाड्या कोकणासाठी
एसटी बस
Follow us on

पुणे : गणेश चतुर्थी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. गणेशोत्सावासाठीची लगबगही सुरू झाली आहे. अनेकांना गणपतीसाठी आपापल्या गावी जाण्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने ज्यादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवासाठी तब्बल 118 अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहेत. यापैकी सर्वाधिक गाड्या या कोकणासाठी सोडल्या जातील. (Pune State Transport Department will release more buses for Ganeshotsav to Konkan)

60 गाड्यांचं बुकींगही फुल्ल

आतापर्यंत अतिरिक्त सोडण्यात येणाऱ्या गाड्यापैकी 60 गाड्यांचं बुकींगही फुल्ल झाल्याचं पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तर इतर गाड्यांचंही आरक्षणही येत्या काही दिवसांत फुल्ल होण्याचा अंदाज आहे. उर्वरित गाड्या या पुणे-मुंबई, पुणे-कोल्हापूर, पुणे-सातारा या मार्गांवर सोडण्यात येणार आहेत. कोकणासाठी 8 सप्टेंबरपासून जास्तीच्या गाड्या सोडण्यात येणार आहेत. सर्वाधिक गाड्या या कोकणातल्या रत्नागिरी, चिपळूण, सिंधुदुर्ग, लांजा आदी मार्गांवर सोडल्या जातील.

गेल्यावर्षी एसटी प्रवासावर होते निर्बंध

गेल्यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे एसटी प्रवासासह इतर बाबींवर निर्बंध होते. यावर्षी गणेशोत्सवापर्यंत कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. मुंबई, पुण्यासह इतर ठिकाणांहूनही अतिरिक्त गाड्या सोडण्यात येत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या भाविकांसाठी निर्बंध

रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्या भाविकांसाठी काही निर्बंध घातले आहेत. त्यानुसार भाविकांना जिल्ह्यात येण्याच्या 72 तास आधी आरटीपीसीआर चाचणी करणं बंधनकारक असणार आहे. आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतरच रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश मिळू शकणार आहे. जर कोरोना लसीचे दोन्ही घेतलेले असतील तर आरटीपीसीआर चाचणीची गरज भासणार नाही. एसटीने येणाऱ्यांनाही ही नियमावली लागू असणार आहे. त्यामुळे भाविकांनी नियमांचं पालन करावं असं आवाहन एसटी प्रशासनाने केलं आहे.

10 सप्टेंबरला गणरायाचे आगमन

यंदा 10 सप्टेंबरला गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सव हा कोकणातील सांस्कृतिक जीवनशैलीचा प्रमुख भाग आहे. कोकणातील प्रत्येक घरात गणपती बसवला जात असल्याने या काळात शहरातील लोक आपापल्या गावी जातात. मात्र, कोरोनामुळे गेल्यावर्षी या प्रथेत खंड पडला होता.

गतवर्षीपेक्षा यंदा कोरोनाचे संकट अधिक गडद आहे. सध्याच्या घडीला रत्नागिरी जिल्हा हा राज्यातील कोरोनाच्या प्रमुख हॉटस्पॉटपैकी एक आहे. त्यामुळे आता रत्नागिरीत आरोग्य यंत्रणांकडून रुग्णांच्या ट्रेसिंगवर भर दिला जात आहे. तरीही गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना गावची ओढ़ लागली आहे. कोकण रेल्वेने आतापर्यंत जाहीर केलेल्या गाड्यांचे गणेशोत्सवासाठीचे आरक्षण फुल्ल झाले आहे.

विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही

मुंबई महापालिका आणि गणेश मंडळे यांच्यात गणेशोत्सवासंदर्भात नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत सर्व मंडळे चार फुटांची मूर्ती आणणार असल्याचं ठरवण्यात आलंय. मोठ्या मंडळाच्या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात न करता विसर्जनस्थळी (चौपट्यावर) विसर्जन करता येणार आहे. तसेच ठराविक कार्यकर्त्यांसह हे विसर्जन करता येणार असून, विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही, असंही बैठकीत ठरलंय.

कोरोनाच्या संकटापायी यंदासुद्धा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. कोरोना असल्याने नियमांचं पालन करावं लागणार आहे. चौपट्यांवर मोठ्या मंडळांना गणपती विसर्जन करता येणार आहे. यावेळी फक्त 10 कार्यकर्ते असतील, कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही, असंही नियमावलीत स्पष्ट करण्यात आलंय.

इतर बातम्या :

“मंदिर बंद, उघडले बार; उद्धवा धुंद तुझे सरकार”, नवी मुंबईत भाजपचे शंखनाद आंदोलन

तुमच्या कन्फर्म तिकिटावर दुसऱ्या कोणालाही प्रवास करता येणार, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Swapnil Joshi : ‘राधे-राधे’ म्हणत स्वप्नील जोशीनं शेअर केले थ्रो बॅक फोटो, श्रीकृष्णाचं हे सुंदर रुप पाहाच