
पुण्यातील वैष्णवी हगवणे यांच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप असणाऱ्या निलेश चव्हाण याला पोलीस कोठडी मिळाली आहे. त्याला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शिवाजीनगर न्यायालयाने दिले. शुक्रवारी पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला नेपाळमध्ये अटक करुन शनिवारी पहाटे पुण्यात आणले होते.
निलेश चव्हाण हा गेल्या नऊ दिवसांपासून फरार होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांची सहा पथके रवाना झाली होती. अखेर शुक्रवारी त्याला नेपाळ सीमेजवळ अटक करण्यात आले. त्यानंतर विमानाने पुण्यात आणण्यात आले. त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आल्यावर शनिवारी सकाळी १० वाजता पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयात आणले. यावेळी पोलिसांनी निलेश चव्हाण याला पाच दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी कोर्टात केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
निलेश चव्हाण यांच्याकडे वैष्णवी हगवणे यांचे बाळ कसे गेले? त्याचा तपास करायचा आहे. तसेच कस्पटे कुटुंबियांना धमकवण्यासाठी त्याने बंदूक वापरली होती. ती बंदूक जप्त करायची आहे. निलेशकडे हगवणे कुटुंबियांचा मोबाईल आहे, तो मिळवायचा आहे. त्यामुळे पाच दिवसांची कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली. मात्र, न्यायालयाने ३ जूनपर्यंत कोठडी दिली आहे.
निलेश चव्हाण याचा मोबाईल जप्त करायचा आहे, त्याचा ऑडिओ रेकॉर्ड करायचा आहे, असे पोलिसांनी म्हटले होते. त्यावर आरोपीच्या वकिलांनी म्हटले, फक्त मोबाईल जप्त करण्यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही. त्यावर आरोपी दोन्ही कुटुंबांचा नातेवाईक नसताना त्याच्याकडे बाळ कसे गेले, असा प्रश्न सरकारी वकिलांनी उपस्थित केला. त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी म्हटले, निलेश चव्हाण याचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही. पुरावे तयार केले जात आहेत. या प्रकरणात निलेशची भूमिका काय हे अद्याप सिद्ध झाली नाही, असे आरोपींच्या वकिलांनी म्हटले आहे.
निलेश चव्हाण याची ३ जून रोजी पोलीस कोठडी संपल्यावर त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यानंतर बावधन पोलिसांकडून पुणे पोलीस त्याचा ताबा घेण्याची शक्यता आहे.