पुणेकर 3 मुद्द्यांवर केंद्राच्या बजेटवर नाराज, या 3 मुद्द्यांचा विचार व्हायला हवा होता

पुण्याच्या मेट्रो प्रकल्पासह अन्य कोणताही प्रकल्प आणि संस्थेसाठी अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.

पुणेकर 3 मुद्द्यांवर केंद्राच्या बजेटवर नाराज, या 3 मुद्द्यांचा विचार व्हायला हवा होता
File Photo
| Updated on: Feb 03, 2023 | 5:04 PM

पुणे : पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो मार्गाचा विस्तार, शहराचे विविध विकास प्रकल्प आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या अनेक संस्था असतानाही केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मात्र पुण्याला काहीच मिळालेले नाही. पुण्याच्या मेट्रो प्रकल्पासह अन्य कोणताही प्रकल्प आणि संस्थेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली नाही. या अशा परिस्थितीमुळे पुणेकरांनी या विकासाच्या गोष्टीवर पाणी सोडले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर देशातील राज्यांनी आणि अनेक शहरं आशावादी होती. अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यावेळी त्यांनी अनेक शहरांची नावं घेतली, मात्र त्यांच्या पूर्ण भाषणात पुण्याचे नाव त्यांनी एकदाही घेतले नाही. या परिस्थितीत पुन्हा एकदा पुणेकरांनी वेठीस धरण्यातील प्रकार झाला आहे.

स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि…

पुण्यासाठी स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. अनेकवेळा जागा बदलल्यानंतर अखेर पुरंदर येथेच पुन्हा विमानतळ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या प्रकल्पाला गती मिळणार या आशेवर पुणेकर होते. त्यामुळे यानिमित्ताने अर्थसंकल्पात भरपूर तरतूद केली जाईल अशी आशाही व्यक्त करण्यात येत होती.

मात्र अर्थमंत्री सीतारामन यांनी 50 नवीन विमानतळ, हेलीपोर्ट, एरोड्रोमची घोषणा केली, मात्र पुरंदर विमानतळासाठी या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद केली गेली नाही.

सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये दर्जेदार शिक्षण संस्थांसाठी जगभरात मान्यता असलेल्या शिक्षण आणि संशोधन संस्थांसाठीही अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद करण्यात आली नाही.

157 ठिकाणी नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात येणार आहेत. त्यामध्ये पुणेही सामील होईल अशी शक्यता होती. याशिवाय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असलेल्या शहरांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी प्रस्तावित तीन सेंटर्स ऑफ एक्सलन्सपैकी एक केंद्र पुण्यात असणे अपेक्षित होते, परंतु अद्याप याबाबत कोणतीही स्पष्टता समोर आलेली नाही.

देशभरातील मेट्रो प्रकल्पांसाठी केंद्राकडून निधी दिला जातो. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. पुण्यात महामेट्रोकडून वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

त्याचबरोबर दोन मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. या मार्गासाठी आणि प्रस्तावित निओ मेट्रोसाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करणे हेही अपेक्षित होते. मात्र अर्थमंत्र्यांच्या भाषणात त्याचा कुठेही उल्लेख करण्यात आला नाही.