
पुणे : महसुली खटल्यांच्या सुनावणीसाठी पुणे (Pune) जिल्ह्यात लवकरच क्यूटी कोर्ट प्रणाली (QT Court System) लागू करण्यात येणार आहे. यासाठी एक अॅपही (App) विकसित केलं जाणार आहे. या क्यूटी प्रणालीच्या माध्यमातून पक्षकारांना आपल्या सुनावणीची तारीख, वेळ आणि खटल्यांची इतर माहिती मोबाईलवरच देणं शक्य होणार आहे. यामाध्यमातून पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिलदार आणि प्रांत अधिकारी यांच्याकडे होणारी गर्दी टाळण्यासाठी मदत होईल. (QT court system will soon be implemented in Pune district for hearing of revenue cases.)
महसुली खटल्यांची माहिती मिळणार मोबाईलवर
जमिनीबाबतचे वाद असलेल्या महसुली खटल्यांची सुनावणी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांसमोर होत असते. त्यासाठी कार्यालयांत पक्षकार, नातेवाईक आणि वकिलांची गर्दी पाहायला मिळते. सध्या कोरोनामुळे गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यातून ही क्यूटी प्रणाली वापरात आणली जाणार आहे. यामध्ये महसुली खटल्यांची माहिती थेट पक्षकाराच्या मोबाईलवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रत्येक दिवशी कोणत्या खटल्यांची सुनावणी होणार आहे, यासह प्रत्यक्ष सुनावणी सुरू असलेला खटला, आणि त्यानंतर सुनावणी होणाऱ्या खटल्यांची माहिती संबंधित पक्षकार आणि वकिलांना अॅपवर दिली जाणार आहे.
राज्यात पहिल्यांदाच अशाप्रकारचा प्रयोग
सध्या कोरोनाचे निर्बंध हळूहळू शिथील होत आहेत. तरीही सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर गर्दी टाळणं आणि नागरिकांना सुनावणीसाठी ताटकळत थांबावं लागू नये यासाठी हा प्रयोग राबवण्यात येत आहे. राज्यात अशाप्रकारे क्यूटी प्रणालीचा हा पहिलाचा प्रयोग आहे. महसुली खटल्यासाठी राज्यात पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच अंमलबजावणी होत आहे.
प्रलंबित खटल्यांचा लवकर निकाल लागण्यासाठी अनेक बदल
जमिनीच्या वादासंदर्भात अनेक खटले सध्या प्रलंबित आहेत. हे सर्व खटले लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रचलित पद्धतीत बदल करण्यात आले आहेत. प्रत्येक खटल्याच्या सुनावणीसाठी ३ मिनिटांचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार एका दिवसात ६० खटल्यांची सुनावणी घेतली जाणार आहेत. प्रत्येक खटल्यासाठी सुनावणीच्या फक्त ३ तारखा दिल्या जाणार आहेत त्यानंतर त्याचा निकाल जाहीर केला जाणार आहे. यामुळे दीर्घकाळापासून प्रलंबित खटल्यांचे निकाल वेगाने लागण्यास मदत होईल.
संबंधित बातम्या :