तारादूतांचं आंदोलन पुन्हा पेटणार, नियुक्त्या न मिळाल्यास शिवजयंतीला आत्मदहनाचा इशारा

| Updated on: Feb 03, 2021 | 1:19 PM

नियक्त्या न दिल्यास 15 फेब्रुवारीपासून आंदोलन करण्याचा इशारा तारादूतांनी दिला आहे. (SARATHI Taradoot candidates Agitation)

तारादूतांचं आंदोलन पुन्हा पेटणार, नियुक्त्या न मिळाल्यास शिवजयंतीला आत्मदहनाचा इशारा
तारादूत आंदोलन
Follow us on

पुणे:छत्रपती शाहू महाराज संशोधन आणि प्रशिक्षण संस्था व मानव विकास संस्था म्हणजेच सारथी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. संस्थेच्या तारादूतांचं आंदोलन पुन्हा तापण्याची शक्यता आहे. तारादूतांनी नियक्त्या न दिल्यास 15 फेब्रुवारीपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच 19 फेब्रुवारीला सारथीसमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तारादूतांनी दिलेलं निवदेन सारथी संस्थेने स्वीकारलं आहे. यापूर्वी डिसेंबर महिन्यात देखील तारादूतांचं आंदोलन पेटले होते. (SARATHI Taradoot candidates warns self burn agitation for appointment letter)

तारादूतांनी 7 डिसेंबर ते 22 डिसेंबर दरम्यान नियुक्त्या मिळण्यासाठी आंदोलनं केले होते. त्यावेळी त्यांनी सारथी संस्थेच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली होती. सारथी संस्थेने त्यावेळी एका महिन्यात नियुक्त्या देण्याचं लेखी आश्वासन दिलं होते. मात्र, ते पाळण्यात आलं नाही, असा दावा तारादूतांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?

सारथी संस्थे तर्फे विविध उपक्रमांसाठी राज्यातील 480 जणांची तारादूत म्हणून निवड करण्यात आली आहे. या तारादूतांना महिन्याला 18 हजार रुपये मानधनही दिले जाते. पण हा प्रकल्प स्थिगीत करण्यात आल्याने या तारादूतांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. हा प्रकल्प पुन्हा सुरु करावा या मागणीसाठी या तारादूतांनी डिसेंबर महिन्यात उपोषणही केले होते. मात्र, तरीही त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे या तारादूतांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ते 15 फेब्रुवारी पासून आंदोलन करणार आहेत.

19 फेब्रुवारीला आत्मदहन करण्याचा इशारा

सारथी संस्थेत सुरु असलेल्या चौकशीचा आणि तारादूत प्रकल्पाचा संबंध नाही. त्यामुळे तारादूतांच्या नियुक्त्या देण्यात याव्यात. 15 फेब्रुवारी पासून सुरु होत असलेल्या आंदोलनाची गंभीर दखल घेतली नाहीतर मराठा समाजाच्या संघटनांच्या पाठिंब्यानं 19 फेब्रुवारीला आत्मदहन करण्याचा इशारा तारातदूतांनी दिला आहे.

डिसेंबरमधील आंदोलनात सारथी कार्यलायत घुसण्याचा प्रयत्न

डिसेंबर महिन्यात सारथी कार्यालयात संचालक मंडळाची बैठक होती त्यावेळीमागण्या मान्य व्हाव्यात म्हणून तारादूतांची कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती. त्याला मराठा आंदोलकांनीही पाठिंबा देत आंदोलनात भाग घेतला. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेल्या मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देतानाच संस्थेत शिरण्याचा प्रयत्नही केला होता. पण पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याने त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यामुळे या कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत झटापटही झाली होती.

संबंधित बातम्या:

तारादूतांचं आंदोलन तापलं; घोषणाबाजी करत मराठा आंदोलकांचा ‘सारथी’त घुसण्याचा प्रयत्न

Pune | सारथी कार्यलयासमोर 5 दिवसांपासून तारादूतांचे ठिय्या आंदोलन

(SARATHI Taradoot candidates warns self burn agitation for appointment letter)