
पुणे | 19 ऑगस्ट 2023 : राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ जुलै रोजी भूंकप झाला. अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडली अन् ते शिवसेना-भाजपच्या गटात दाखल झाले. अजित पवार यांच्यासोबत नऊ जण शिवसेना-भाजप सरकारमध्ये सहभागी झाले. यानंतर पक्ष सावरण्यासाठी स्वत: शरद पवार मैदानात उतरले. त्यांनी राज्याच्या विविध भागांत दौरे सुरु केले आहेत. राज्यातील प्रत्येक मतदार संघ पिंजून काढण्याचे काम शरद पवार करणार आहेत. शरद पवार आक्रमक झाले असताना आता अजित पवारही सक्रीय झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांना रोखण्याची जबाबदारी अजित पवार यांच्यावर आली आहे. आपला गट मजबूत करण्याचे काम पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार करणार आहेत. त्यासाठी त्यांच्यावर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रात काका विरुद्ध पुतण्या अशी लढत आगामी निवडणुकांमध्ये दिसणार आहे.
शरद पवार राज्यात दौरे करीत आहेत. यामुळे राज्यात आपला पक्ष मजबूत करण्यासाठी अजित पवार गटाने तयारी केली आहे. शरद पवार प्रत्येक मतदार संघात सभा घेणार आहेत. यामुळे अजित पवार यांची टीम सक्रीय झाली आहे. अजित पवार यांच्याबरोबर छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे यांच्यावर जबाबदारी दिली आहे.
छगन भुजबळ मुंबई आणि नाशिक सांभाळणार आहे. तर प्रफुल्ल पटेल यांच्यावर विदर्भाची जबाबदारी आहे. ते भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, नागपूरमध्ये पक्ष बळकट करणार आहेत. धनजंय मुंडे यांच्यावर मराठवाड्याची जबाबदारी दिली आहे. यामुळे आगामी काळात राज्यात शिंदे-ठाकरे गटाप्रमाणे पवार विरुद्ध पवार असा राजकीय संघर्ष दिसणार आहे. परंतु हा संघर्ष पश्चिम महाराष्ट्रात अधिक रंगणार आहे. या ठिकाणी शरद पवार यांच्या सोबतीला सुप्रिया सुळेही असणार आहे.