बोकड खायचं की चिकन, फिश… खवय्यांची सकाळपासूनच दुकानांवर तुफान गर्दी, रांगाच रांगा लागल्या… श्रावणापूर्वीचा संडे दणक्यात जाणार

Sharavan Aashad Month : आखाड महिन्याचा शेवटचा रविवार आहे. पुणेकरांची मटण आणि चिकन मार्केटमध्ये गर्दी झाली आहे. कोल्हापूरसह राज्यातील अनेक शहरात खवय्यांनी मटण-चिकन दुकानासमोर तुफान गर्दी केली आहे.

बोकड खायचं की चिकन, फिश... खवय्यांची सकाळपासूनच दुकानांवर तुफान गर्दी, रांगाच रांगा लागल्या... श्रावणापूर्वीचा संडे दणक्यात जाणार
मटण,चिकन दुकानांसमोर एकच गर्दी
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 20, 2025 | 12:24 PM

येत्या गुरुवारपासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी नॉनव्हेज प्रेमींनी आज पुण्यातल्या मटण आणि चिकन मार्केटमध्ये मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. आज रविवारचा मुहूर्त साधत मटण खाण्यासाठी खवय्यांनी दुकानांसमोर गर्दी केली आहे. पुढे महिनाभार श्रावण असल्याने खवय्यांना मटण, चिकनवर तावा मारता येणार नाही. त्यामुळे खवय्यांनी या रविवारीच संधी साधून घेत मोठा बेत आखला आहे. आज खवय्ये पोटावरून हात फिरवत तृप्तीचा ढेकर देणार आहेत.

पुण्यात दुकानासमोर गर्दीच गर्दी

आजचा शेवटचा रविवार असल्याने पुणेकरांनी पहाटेपासून मोठी गर्दी या मटणाच्या दुकानाच्या बाहेर गेलेली पाहायला मिळत आहे.. पहाटे पाच पासून लोकांनी मोठी रांग पुण्यातील मटन दुकानांच्या बाहेर लावलेली आहे.तीन दिवसात श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे त्यानंतर या नॉनव्हेज प्रेमींना मटण आणि चिकन खाता येणार नाही .म्हणून आजच हे सगळे आपल्या आवडत्या नॉनव्हेज पदार्थावर ताव मारणार आहेत.  यासाठीच शहरातील सर्व दुकानांबाहेर मटण आणि चिकन खरेदीसाठी आता पुणेकरांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. पुण्याच्या मटन मार्केट मधून आज जवळपास 3000 किलो मटणाची विक्री होण्याचा अंदाज विक्रेत्यांनी वर्तवला आहे.

आषाढ महिन्यात अंडे महागले

यावेळी आषाढात अंड्यांच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात दर ७८ ते ९० रुपये डझनपर्यंत पोहोचले आहेत. मार्चमध्ये मुंबईत १०० अंडींसाठी घाऊक दर ४७० रुपये होता, तो जूनच्या अखेरीस ५९१ रुपये इतका झाला होता. अधिक उष्म्यामुळे पक्ष्यांच्या मृत्यूमुळे उत्पादन घटले आणि पावसाळ्यात वाहतुकीतील अडथळ्यांमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली, असे पोल्ट्री व्यवसायिकांचे म्हणणे आहे. लोखंडवाला येथे अंडी ९० रुपये, वांद्रे आणि बोरीवलीत ८० रुपये, तर वसईत ७८ रुपय दराने विकली जात होती. ऑनलाइन खरेदीदारांना चेंबूर आणि कांजुरमार्ग येथे ११७ रुपये डझन दर मोजावा लागला होता. सहा ‘स्पेशल अंडी’च्या बॉक्सची किंमत ५७ रुपये अथवा त्यापेक्षा अधिक झाली होती. आता श्रावण येणार असल्याने अंडे स्वस्त होण्याची शक्यता आहे.