‘संभाजी’ कादंबरीतील अंत्यसंस्काराचा उल्लेख काल्पनिक, विश्वास पाटलांची मोठी कबुली, कोरेगाव भीमा आयोगासमोर उलट तपासणीत काय केला दावा

Vishwas Patil on Sambhaji Novel: छत्रपती संभाजी महाराज यांच्या अंत्यसंस्काराबाबत काही दावे आहेत. त्यावरून काही समज-गैरसमजही आहेत. शंभुप्रेमी त्यामुळे दुखावले आहेत. संभाजी या कादंबरीतील अंत्यसंस्काराचा उल्लेख हा पूर्णतः काल्पनिक असल्याची कबुली लेखक विश्वास पाटील यांनी दिली आहे.

संभाजी कादंबरीतील अंत्यसंस्काराचा उल्लेख काल्पनिक, विश्वास पाटलांची मोठी कबुली, कोरेगाव भीमा आयोगासमोर उलट तपासणीत काय केला दावा
विश्वास पाटील संभाजी कादंबरी
Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 07, 2026 | 11:24 AM

Koregaon Bhima Commission: छत्रपती संभाजी महाराज यांच्या अंत्यसंस्काराबाबत कोणत्याही ऐतिहासिक दस्तऐवजात स्पष्ट उल्लेख नसल्याची कबुली लेखक विश्वास पाटील यांनी दिली आहे. संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्काराविषयी अनेक समज-गैरसमज आहेत. काही ऐतिहासिक कादंबऱ्या, काही इतिहासतज्ज्ञ आणि कथाकारांनी याविषयी जे भाष्य केले आहे. त्यावरून शंभुप्रेमी दुखावेलेल आहेत. तर समाजा-समाजातही तेढ निर्माण झाली आहे. अशावेळी विश्वास पाटील यांनी कोरेगाव भीमा आयोगासमोरील उलटतापसणीत या कादंबरीतील जना परीटिण, गोविंद नाक, दामाजी पाटील आणि पाटलीण यासारखी पात्रे काल्पनिक असल्याचे मान्य केले.

कोरेगाव भीमा आयोगासमोर सुनावणी

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत ‘संभाजी’ या कादंबरीतील महाराजांच्या अंत्यविधीवरील कथनावरून वाद निर्माण झाला होता. काही लोकांनी महाराजांचा अत्यंविधी विशिष्ट व्यक्तींनी केला यावरुन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून 1 जानेवारी 2018 रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्याविषयीची चौकशी आयोगासमोर सुरू आहे. शुक्रवारी दिवसभर याविषयीची सुनावणी झाली. विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी लेखक विश्वास पाटील यांची सविस्तर उलट तपासणी घेतली. यावेळी कादंबरीत अनेक पात्र आणि उल्लेख काल्पनिक असल्याची कबुली त्यांनी दिली. तसेच त्याआधारे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे.

अंत्यसंस्काराचा ऐतिहासिक दस्तामध्ये उल्लेख नाही

ॲड.शिशिर हिरे यांनी उलटतपासणीत लेखक विश्वास पाटील यांना याविषयीचा प्रश्न विचारला होता. त्यावेळी संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्काराबाबत कोणत्याही ऐतिहासिक दस्ताऐवजात स्पष्ट उल्लेख आढळत नाही असे विश्वास पाटील म्हणाले. तर जेधे शकवली, मासीरे आलमगिर, ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खाफी खान या तत्कालीन इतिहासकारांचा त्यांनी उल्लेख केला. विश्वास पाटील यांनी संभाजी कादंबरीतील कल्पनाविलास यावेळी उलटतपासणीत मांडला.

संभाजी या कादंबरीतील जना परीटिण असो वा गोविंद नाक, दामाजी पाटील अथवा पाटलीण ही पात्र पूर्णपणे काल्पनिक असल्याचे विश्वास पाटील यांनी सांगितले. संभाजी ही कादंबरी भूभाग आणि काही तथ्यावर आधारीत कल्पना विलास असल्याचे पाटील यांनी सांगितल्याचे ॲड.शिशिर हिरे यांनी माहिती दिली. तर कादंबरीतील लिखाणावरून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हा निषेधार्ह असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.

Follow Us