Uday Samant : एकनाथ शिंदे उद्यानाला आता आनंद दिघेंचं नाव देणार, वादानंतर उदय सामंतांचं स्पष्टीकरण; राजकीय नावांना पुणेकरांचा विरोधच

हडपसर परिसरात एक उद्यान ज्याला एकनाथ शिंदे यांचे नाव देण्यात आले, त्यावरून वाद निर्माण झाला. हे नामकरण नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याची तक्रार विविध स्वयंसेवी संघटनांनी केली.

Uday Samant : एकनाथ शिंदे उद्यानाला आता आनंद दिघेंचं नाव देणार, वादानंतर उदय सामंतांचं स्पष्टीकरण; राजकीय नावांना पुणेकरांचा विरोधच
एकनाथ शिंदे उद्यान/उदय सामंत
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Aug 02, 2022 | 2:50 PM

पुणे : एकनाथ शिंदे उद्यानाला आनंद दिघेंचे (Anand Dhighe) नाव द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना महत्त्वाच्या असतात. मी कमीशनरशी याबाबतीत बोलणार आहे, असे वक्तव्य शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी केले आहे. ते पुण्यात बोलत होते. नामदार मा. श्री. एकनाथ भाई शिंदे उद्यान असे नामकरण करण्यात आलेल्या उद्यानाचे खुद्द एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनावरून मोठा वाद निर्माण झाला. तो कार्यक्रम रद्द करण्याची नामुश्की आली. आता त्यावर सारवासारव करण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न सुरू झाला असून आता या उद्यानाला आनंद दिघे यांचे नाव देण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. याविषयी आपण आयुक्तांशीही (Commissioner) चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले आहेत. चांगल्या उद्देशाने लोकार्पणाचा सोहळा ठेवला होता. स्वत:च्या निधीतून नेत्यांच्या पोटी सोहळा ठेवला होता, असे सामंत म्हणाले.

काय वाद?

हडपसर परिसरात एक उद्यान ज्याला एकनाथ शिंदे यांचे नाव देण्यात आले, त्यावरून वाद निर्माण झाला. हे नामकरण नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याची तक्रार विविध स्वयंसेवी संघटनांनी केली. या उद्यानाचा उद्घाटन सोहळादेखील वादात सापडला. विशेष म्हणजे महापालिकेच्या जागेवर हे उद्यान उभारण्यात आले आहे. तरीदेखील स्वनिधीतून उद्यान उभारण्यात आल्याचा दावा उदय सामंत यांनी केला. शिंदे समर्थक असलेले आणि माजी नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी या उद्यानाला शिंदेचे नाव देण्याचे ठरवले होते. याला पुणेकरांनी प्रचंड विरोध केला.

शिंदेंच्याच हस्ते उद्घाटन

भाजपा-शिंदे गटातील सरकारच्या कार्यपद्धतीवर अनेकांनी आक्षेप घेतले आहे. पुण्यात आधीच सॅलिसबरी पार्कच्या नावाचा मुद्दा वादात असताना त्यात या उद्यानाची भर पडली आहे. दुसरीकडे उदय सामंत यांनी या उद्यानाला आता आनंद दिघे यांचे नाव देण्यात येणार असून याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच हस्ते तेदेखील आज संध्याकाळीच करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. जे लोक टीका करत आहेत, ती केवळ मुख्यमंत्र्यांना मिळणाऱ्या पाठिंब्यामुळेच, असा दावा देखील त्यांनी केला.

बंडखोरांच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे दौरे सुरूच

राज्यात पूरपरिस्थिती असताना मुख्यमंत्री केवळ बंडखोर नेत्यांच्या मतदारसंघात दौरे करत असून विरोधकांकडून तसेच सामान्यांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यावर सारवासारव करताना उदय सामंत म्हणाले, की मुख्यमंत्री केवळ रत्नागिरीत येत आहेत, असे नाही. त्यांचा संघटानात्मक दौरा आहे. सर्वच पक्षांना आपापला पक्ष वाढवायचा आहे. आमचे 55 आमदार आहेत, ते पुढच्या विधानसभेला 100 होणार आहेत, असा दावा सामंत यांनी केला.