पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी, एक्सप्रेस थांबवली, श्वान पथक घटनास्थळी; प्रवासी दहशतीखाली

रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याशिवाय कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास त्याची माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी, एक्सप्रेस थांबवली, श्वान पथक घटनास्थळी; प्रवासी दहशतीखाली
pune railway station
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 14, 2023 | 10:05 AM

पुणे: पुणे रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी आली आहे. अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने फोन करून पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. त्यामुळे पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी तात्काळ रेल्वे स्थानकावर धाव घेऊन एक्सप्रेस थांबवल्या आणि बॉम्बचा शोध घेण्यास सुरू केली. श्वान पथकाच्या माध्यमातून बॉम्बचा शोध घेण्यात आला. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. प्रवाशांनीही जीव मुठीत घेऊन स्थानकातून पळ काढला. त्यामुळे या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

काल रात्री अज्ञात इसमाने फोन करून पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून दिल्याची धमकी दिली. ही धमकी मिळताच रेल्वे पोलीस अलर्ट झाले. पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन लगेचच परिसराची पाहणी सुरू केली. पोलिसांनी प्रवाशांना तात्काळ बाहेर काढलं. रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याचं प्रवाशांना कळाल्यानंतर प्रवाशांचीही घाबरगुंडी उडाली. प्रवासीही आपला जीवमुठीत घेऊन सैरावैरा पळाले.

त्यानंतर रेल्वे पोलिसांच्या श्वान पथकाने संपूर्ण रेल्वे प्लॅटफॉर्म, रेल्वे रुळ, प्लॅटफॉर्मवरील प्रत्येक रुम आणि एक्सप्रेसची पाहणी केली. यावेळी पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. त्यानंतर पोलिसांनी प्रवाशांना रेल्वे स्थानकात सोडण्यास सुरुवात केली आहे.

तसेच रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याशिवाय कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास त्याची माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान, हा धमकीचा फोन कुणी केला? कुठून आला? याची माहिती मिळालेली नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, पोलिसांनी वर्दळीच्या या रेल्वे स्थानकाची सुरक्षा अधिक वाढवली असून प्रत्येकाच्या हालचालीकडे लक्ष ठेवलं जात आहे. तसेच रेल्वे प्रशासनही अलर्ट मोडवर आलं आहे.

26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांकडून पुणे रेल्वे स्थानक, कामशेत रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी दिली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. रात्री 2 पासून पुणे रेल्वे स्थानक आणि कामशेत रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.

त्यामुळे पोलिसांनी रात्रीपासून रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तपासणी सुरू केली आहे. आलेल्या कॉलचा तपास करण्याचं काम सुरू आहे. पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत.