विद्यानंद बापटांना मारहाण, सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या, अमित शाहांनाच फोन…

विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याचा खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र निषेध केला आहे. आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्या मागे कोणती यंत्रणा आहे, याचा शोध घेण्याची मागणी त्यांनी केली. पुण्यातील वाढत्या गुंडगिरीवर चिंता व्यक्त करत, कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयश आल्यास थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना संपर्क साधण्याचा इशाराही सुळे यांनी दिला. हा प्रकार लोकशाहीला घातक असून महाराष्ट्राची बदनामी करणारा आहे, असेही त्या म्हणाल्या.

विद्यानंद बापटांना मारहाण, सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या, अमित शाहांनाच फोन...
supriya sule
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 03, 2026 | 12:48 PM

विद्यानंद बापट यांना मारहाण करणं ही निषेधार्ह घटना आहे. आम्ही या घटनेचा निषेध नोंदवत आहोत. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. मारहाण करणाऱ्या व्यक्तीला अटक झालीच पाहिजे. त्याच्या मागे कोणती यंत्रणा काम करत आहे याचा शोध घेतला पाहिजे. पुण्यातील गुंडागर्दी वाढली असून त्याची चौकशी झालीच पाहिजे, असं सांगतानाच हे प्रकार असेच वाढत असतील तर आता मुख्यमंत्र्यांना नाही तर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना फोन करून न्याय मागावा लागेल, अशी संतप्त प्रतिक्रिया शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. त्या टीव्ही9 मराठीशी बोलत होत्या.

पुण्यात गणपती उत्सावात ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी डीजेवर बंदी घालण्याची मागणी विद्यानंद बापट यांनी केली आहे. बापट यांच्या मागणीमुळे गेल्या आठ दिवसांपासून पुणे ढवळून निघालं आहे. या पार्श्वभूमीवर बापट यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. टीव्ही9 मराठीशी संवाद साधत असतानाच एका व्यक्तीने येऊन कॅमेऱ्यासमोर बापट यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. सुप्रिया सुळे यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

मारणाऱ्या मागे कुणाची ताकद?

या प्रकरणाची मीही माहिती घेत आहे. पण माध्यमांशी बोलताना कुणाला मारणं योग्य नाही. कोण मारतं? कशासाठी मारत आहे? हिंमत कशी होते यांची? एखादी व्यक्ती शांततेने माध्यमांशी बोलत असेल तर लोकशाहीत तो त्याचा अधिकार आहे. ही गुंडागर्दी नाही तर काय आहे.? मारणारा कोण आहे? मारणाऱ्याला अटक केली पाहिजे. त्याच्या मागे कोण आहे? मारहाण करणाऱ्याच्या मागे कोणती ताकद आहे? कोणती यंत्रणा आहे? याचा तपास केला पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं

भाजपने गुंडागर्दी कधी कमी होणार हे सांगितलं पाहिजे. सत्तेत ते आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांना उत्तर द्यावं लागेल. एक व्यक्ती लोकशाही पद्धतीने बोलत असेल तर त्याला मारलं जातं आहे. हे सहन होणारं नाही. याची चौकशी व्हावी. मी मुख्यमंत्र्यांना फोन करणार आहे. एखाद्या व्यक्तीला मारण्याची हिंमत कशी होते? पाठीमागे मोठी ताकद असल्याशिवाय हे कोण करेल? महाराष्ट्रासाठी हा काळा दिवस आहे. महाराष्ट्राची बदनामी होतेय. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, आवरा हे गुंड, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं.

दुसरा पर्याय काय आमच्यासमोर?

लोकशाहीची हत्या होतेय. लोकशाही राहिली नाही. खरं बोललं तर हे मारामारी करणार. हा देश लोकशाहीनेच चालला पाहिजे. असले प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. पुण्याचा नियम मोडण्याचा कुणी प्रयत्न केला असेल तर या विशिप्त वागण्यावर आम्ही आवाज उठवणार. पुण्यात सर्वाधिक क्राईम आहे. हे मी सांगत नाही. हा अमित शाह यांचा डेटा आहे. राज्यात सर्वाधिक गुंडागर्दी पुण्यात आहे, असं अमित शाहांचा डेटा सांगतोय. ही गुंडागर्दी होत असेल तर आम्हाला मुख्यमंत्र्यांशी नाही, थेट अमित शाहांशीच बोलावं लागेल. दुसरा मार्ग काय आमच्यासमोर? असा सवाल त्यांनी केला. माझा जन्म पुण्याचा आहे. पुणे सुसंस्कृत शहर आहे. ही पुण्याची बदनामी करण्याचं षडयंत्र आहे. पुणेकरांची बदनामी होत असेल तर आम्ही कोर्टात जाऊ, असं त्या म्हणाल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us