बळीराजासाठी सर्वात मोलाची बातमी, शेतकऱ्यांच्या मदतीला योग्यवेळी पाऊस धावून येणार?

पाऊस वेळेवर पडला तर बळीराजाला दिलासा मिळतो. पण पावसाने विलंब केला तर बळीराजाचं संपूर्ण वर्षभरातं गणित बिघडतं. त्यामुळे पाऊस वेळेवर पडणं जास्त गरजेचं आहे. या दरम्यान हवामान विभागाकडून पावसाबद्दल महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे.

बळीराजासाठी सर्वात मोलाची बातमी, शेतकऱ्यांच्या मदतीला योग्यवेळी पाऊस धावून येणार?
Image Credit source: tv9
| Updated on: May 16, 2023 | 11:12 PM

मुंबई : महाराष्ट्रात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना किती छळलं हे शब्दांमध्ये कधीही सांगता येणार नाही, इतकं भयानक हे वास्तव आहे. पाऊस वेळेवर पडला, शेतात पिकांना बहर आला आणि ऐनवेळी पीक काढणीला अवकाळी पावसाने हाहाकार माजवला तर बळीराजाच्या मनाला असह्य वेदना होतात. गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी याच वेदना सहन केल्या. पण आता शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागले आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या नजरा या आभाळाकडे लागलेल्या असतात. पाऊस कधी पडेल आणि शेतीसाठी पुढची कामे कशी ठरवायची याबाबतची रचना आखायची असते. आतादेखील राज्यातील शेतकरी याचबाबत विचार करत आहेत. पावसाची वाट पाहणाऱ्या या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

पुणे हवामान विभाग शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी आगामी मान्सून विषयी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्रात मान्सून अतिशय योग्य वेळेत दाखल होणार असल्याची माहिती हनुमान विभागाकडून मिळाली आहे. मान्सून महाराष्ट्रात 6 किंवा 7 जूनला दाखल होतो, असं मानलं जातं. यावर्षी अगदी त्याच वेळेत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्रात 6 जूनला पावसाचं आगमण होण्याची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 6 जूनला मान्सून दाखल होणार आहे. महाराष्ट्राआधी केरळमध्ये मान्सून दाखल होतो. त्यानंतर महाराष्ट्रात मान्सून कधी येणार याबाबतचे अंदाज बांधले जातात. यावर्षी मान्सून केरळमध्ये 4 जूनला दाखल होणार आहे. तर दोन दिवसानंतर म्हणजेच 6 जूनला महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीत एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दरवर्षी 1 जून रोजीला मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो. मात्र यंदा पाऊस 2 ते 3 दिवस लांबण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. पण तरीही महाष्ट्रात वेळेवर दाखल होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे भारतात यंदा 96 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मॉन्सूनच्या दुसऱ्या सत्रात भारतात एल निनोचा प्रभाव पाहायला मिळू शकतो, अशी माहिती पुणे हवामान विभाग शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिली.

राज्यात सध्या प्रचंड उकाडा

राज्यात सर्वदूर प्रचंड ऊन पडतंय. उकाड्यामुळे नागरीक प्रचंड हैराण झाले आहेत. दुपारच्यावेळी घराबाहेर पडलं तर घामाच्या अक्षरश: धारा लागतात, अशी अवस्था आहे. जास्त उष्णेतेमुळे अनेकांना त्रास होतोय. अनेकांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा देखील बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक नागरीकही पावसाची वाट पाहत आहेत, जेणेकरुन उकाड्यापासून मुक्तता होईल.