MIM पक्षावर तत्काळ बंदी घाला, निदा खानला अटक होताच सर्वात मोठी मागणी समोर; बड्या नेत्याने थेट…
नाशिकच्या आयटी कंपनीतील कथित धर्मांतर प्रकरणातील निदा खान हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आता एमआयएम या पक्षाचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत.

Nashik IT Company Case : नाशिकच्या आयटी कंपनीतील कथित धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान गायब होती. पोलीस तिचा शोध घेत होते. निदा खान हिला लपवण्यात एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांचा हात आहे, असा आरोप मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. तर हे सर्व आरोप जलील यांनी फेटाळून लावले आहेत. दुसरीकडे आता याच प्रकरणावर माजी खासदार तथा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठी मागणी केली आहे. त्यांनीही जलील यांच्यावर आरोप केले असून एमआयएम पक्षावर थेट बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.
एमआयएमवर घाला बंदी
ज्या ठिकाणावरून निदा खानला पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्या परिसरात अनेक अवैध धंदे सुरू आहेत, असा आरोप खैरे यांनी केला. तसेच त्या भागातील एमआयएमच्या मतीन नावाच्या नगरसेवकालाही अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. छत्रपती संभाजीनगर नावाचा इम्तियाज जलील यांना पहिल्यापासूनच राग आहे. त्या मुलीला लपवण्यामागे मतीन पटेल आणि त्यांचे बॉस इम्तियाज जलील यांचा हात आहे, असा गंभीर आरोपही खैरे यांनी केला. तसेच एमआयएमवर बंदी घालण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचंही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.
हे तर मोठे षडयंत्र
दुसरीकडे नाशिकच्या कथित धर्मांतर प्रकरणी अटक केलेल्या निदा खान हिला मदत करण्यात इम्तियाज जलील यांचा मुख्य रोल आहे, असा आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. निदा खान ही संभाजीनगरमध्ये सापडणं यामागे खूप मोठे षडयंत्र असून याप्रकरणी इमत्याज जलील व एमआयएम नगरसेवकाची, पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणीदेखील गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ते सांगलीच्या जतमध्ये बोलत होते.
पालकमंत्र्यांना कवडीची किंमत देत नाही
दरम्यान, या आरोपांवर जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी कोणत्याही पालकमंत्र्यांना कवडीचीही किंमत देत नाही, असे म्हणत त्यांनी संजय शिरसाट यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दुसरीकडे पोलिसांनी ताब्यात घेतलेली निदा खान ही दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. तिची विशेष काळजी घेतली जात आहे.