मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

मंगळवारी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं, या आंदोलनावरून आता एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल
Eknath Shinde
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 22, 2026 | 7:09 PM

शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने संसदेवर मोर्चा काढण्यात आला, यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. दरम्यान त्यानंतर यावरून मंगळवारी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं. मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. राहुल गांधी यांनी तब्बल तीन तास या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं, त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान यावरून आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींनी ज्या ठिकाणी आंदोलन केलं ते चुकीचं होतं, राहुल गांधींना घातपात करायचा होता का? असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी मंगळवारी तब्बल तीन तास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन केलं, या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी हा सवाल केला आहे.

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत. एवढ्या मोठ्या जबाबदार पदावर असताना राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर जे आंदोलन केलं ते अतिशय बेजबबदार पद्धतीचं आहे. ज्या ठिकाणी कोणी आंदोलन करू शकत नाही, अशा ठिकाणी तुम्ही जाता आणि लोकांना आवाहन करता इकडे या म्हणून, म्हणजे तुम्हाला काय करायचं होतं? पंतप्रधानांच्या निवासस्थानी तुम्हाला काही घात पात करायचा होता का? तुमच्या मनामध्ये काय होतं? या देशात अराजकता पसरवायची आहे का तुम्हाला? असा सवाल यावेळी एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांना केला आहे.

दरम्यान या सर्व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ज्यांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, त्यांच्यावर कारवाई करा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अशी मागणी या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांनी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us