छत्रीचा माईक अन् खड्डयांचं जबरदस्त रिपोर्टिंग, रायगडमधील व्हायरल शाळकरी मुली कोण?

School Girls Viral Video : रायगड जिल्ह्यातील कर्जत-कोंदिवडे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी शाळकरी मुलींनी एक व्हिडिओ बनवून शेअर केला होता. या व्हिडिओतील मुली कोण आहेत ते जाणून घेऊयात.

छत्रीचा माईक अन् खड्डयांचं जबरदस्त रिपोर्टिंग, रायगडमधील व्हायरल शाळकरी मुली कोण?
Karjat Viral School Girls
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Aug 10, 2026 | 5:46 PM

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कर्जत-कोंदिवडे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शाळकरी मुलांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी शाळकरी मुली नेहा घारे आणि ज्योत्स्ना मुकणे यांनी या रस्त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आणि हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. महत्त्वाची बाब म्हणजे या मुलींनी छत्रीचा माईक बनवून हा व्हिडिओ शूट केला होता. अशातच आता या मुली कोण आहेत हे सविस्तर जाणून घेऊयात.

कोण आहेत या मुली?

नेहा घारे आणि ज्योत्स्ना मुकणे या मुलींनी आपल्या परिसरातील समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी घेतलेल्या या पुढाकाराचं त्यांच्या पालकांनी कौतुक केलं आहे. ‘आम्हाला आमच्या मुलींचा अभिमान आहे,’ अशी भावना त्यांच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. आपल्या मुलींनी स्वतःच्या अडचणींसोबतच गावातील नागरिकांच्या समस्येसाठीही आवाज उठवल्याचा अभिमान असल्याचं त्यांनी सांगितलं.

छत्रीचा माईक बनवून मांडल्या समस्या

व्हायरल व्हिडिओतील एक मुलगी आठवीला तर दुसरी मुलगी नववीला आहे. तर मानसी पवार हिने कॅमेरामन म्हणून काम केले होते. नेहा घारे हिने रिपोर्टरची भूमिका साकारत हातात छत्रीचा माईक पकडत दुसऱ्या मुलीला प्रश्न विचारले. तर ज्योत्स्ना हिने तिच्या प्रश्नांना उत्तर देत रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल माहिती दिली. तसेच मानसी पवार हिने मोबाईलद्वारे संपूर्ण व्हिडिओ शूट केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

रस्ता दुरूस्त करण्याची मागणी

या विद्यार्थ्यांनी गावातील रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे, साचलेले चिखलाचे डबके आणि त्यावरून होणारी अपघाताची शक्यता कॅमेऱ्यासमोर मांडत प्रशासनाचा कारभार उघडा पाडला. या दुरवस्थेमुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे होणारे हाल, प्रवाशांची गैरसोय आणि वाहनांचे होणारे नुकसान या गंभीर समस्यांना विद्यार्थ्यांनी आपल्या संवादातून वाचा फोडली. विद्यार्थ्यांच्या या कल्पक आणि थेट प्रशासनाला जाब विचारणाऱ्या व्हिडिओने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे लक्ष वेधले असून प्रशासनाने त्वरित रस्ता दुरुस्त करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us