गर्भवती महिला राहिली बाजूला, ओटीमध्येच डॉक्टर आणि नर्समध्ये हाणामारी, थेट छत्रीने मारहाण
रायगडमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात गर्भवती महिलेची डिलिवरी झाल्यानंतर ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर आणि नर्समध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला पोहोचला की दोघींमध्ये हाणामारी चालू झाली.

रायगडमधील पेण येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांना संपर्क केल्यानंतरही डॉक्टर आले नाहीत. शेवटी महिलेची डिलिव्हरी झाली. दरम्यान, ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर आणि नर्समध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला पोहोचला की दोघींमध्ये हाणामारी सुरु झाली. डॉक्टरने नर्सला छत्रीने मारहाण केली. त्यानंतर डॉक्टरविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
पेण उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीकळांनी विव्हळणाऱ्या महिलेला वेळेत तपासणी न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. १० ऑगस्ट रोजी पहाटे दोन वाजता गौरी देवजी कडू या प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्या. ऑनड्युटी नर्सने स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कृष्णा सोनावणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क न झाल्याने लेखी कॉल देण्यात आला. तरीही डॉक्टर रुग्णालयात आले नसल्याचा आरोप आहे. उलट डॉक्टरने गर्भवती महिलेला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.
डॉक्टर आणि नर्समध्ये हाणामारी
दरम्यान, प्रसूतीकळा वाढल्याने डॉक्टरांशिवाय रुग्णालयातच महिलेची प्रसूती झाली. त्यानंतर टाके घालण्याच्या प्रक्रियेवरून डॉक्टर आणि नर्समध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रसूतीनंतर महिलेला टाके घालण्याची प्राथमिक वैद्यकीय जबाबदारी डॉक्टरांची असताना, डॉ. कृष्णा सोनावणे यांनी हे काम तेथे उपस्थित असलेल्या नर्सला करण्यास सांगितले. मात्र, नियम आणि जबाबदारीचे कारण देत नर्सने हे काम करण्यास नकार दिला. यावेळी नर्सला शिवीगाळ करून छत्रीने मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात संबंधित डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नर्सने केली पोलिसात तक्रार
हा मारहाणीचा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न पीडित नर्सने केला होता. मात्र, डॉक्टरांनी पुन्हा तिला मारहाण केली. या घटनेनंतर घाबरलेल्या आणि अपमानित झालेल्या नर्सने थेट पेण पोलीस ठाणे (Pen Police Station) गाठले आणि तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पेण पोलिसांनी आरोपी डॉक्टर कृष्णा सोनावणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.