रायगडच्या महाडच्या MIDC मध्ये भीषण आग; 6 जणांचा मृत्यू,11 जण बेपत्ता

| Updated on: Nov 04, 2023 | 12:41 PM

Raigad MIDC Bluejet Healthcare Company Fire News : राडगडमधल्या महाड MIDC मध्ये भीषण आग लागली आहे. या आगीत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 11 जण अद्याप बेपत्ता आहेत. NDRF च्या पथकाकडून तिथं तातडीने मदत केली जात आहे. घटनास्थळी नेमकं काय घडतंय? वाचा सविस्तर...

रायगडच्या महाडच्या MIDC मध्ये भीषण आग; 6 जणांचा मृत्यू,11 जण बेपत्ता
Follow us on

महाड, रायगड | 04 नोव्हेंबर 2023 : रायगडमधून मोठी बातमी… रायगडच्या महाड एमआयडीसीत भीषण आग लागली आहे. महाड MIDC तील ब्लूजेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या आगीत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. सात जण गंभीर जखमी आहेत. महाड ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर 11 जण बेपत्ता आहेत. अग्नीशमन यंत्रणा आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तिथं तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आलं आहे. यात जे लोक बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. NDRF च्या पथकाकडून सर्च ऑपरेशन सुरू सध्या सुरु आहे.

महाड एमआयडीसीतील आगीत होरपळून सहा जणांचा मृत्यू झाला. तर 11 जणांचा अद्यापही शोध घेतला जात आहे. अशात या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या आणि बेपत्ता लोकांचे कुटुंबीय ब्लूजेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीच्या परिरसात पोहोचले. यावेळी या नागरिकांनी आक्रोश केला. आपल्या आप्तेष्टांच्या आठवणीने त्यांनी टाहो फोडला. या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

महाड एमआयडीसीमध्ये जिथे आग लागली. या ठिकाणी राज्याचे उद्योगमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मध्यरात्री पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाड एमआयडीसी मध्ये ब्लूजेट हेल्थकेअर कंपनीला भीषण आग लागली होती. पाच तासानंतर ही आग आटोक्यात आली आहे. सात जण जखमी तर 11 जण बेपत्ता असल्याची माहिती देखील समोर येत आहे. खरंतर एनडीआरएफचं पथक हे हेलिकॉप्टरने येणार होतं. मात्र हवामानात बदल झाला आहे. हे वातावरण हेलिकॉप्टरच्या उड्डाणासाठी योग्य नाही. त्यामुळे त्यांना गाडीने यावं लागलं पाच तास त्यांना लागतंय. सध्या एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

कंपनीच्या आतमध्ये केमिकल असल्याने त्यांना देखील काम करणं अवघड होत आहे.संबंधित कंपनीच्या मालकाशी आणि नातेवांकांशी देखील माझं बोलणं झालं आहे. योग्य ती कारवाई करा, असे देखील निर्देश मी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, असंही सामंत म्हणाले.