राज्यात चार दिवस पावसाचा ब्रेक, विदर्भात मात्र यलो अलर्ट, या तारखेनंतर पाऊस सक्रीय

IMD Monsoon Update : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. आता पुढील चार दिवस राज्यात पाऊस ब्रेक घेणार आहे. विदर्भ वगळता कुठेही पावसाचा अलर्ट दिला नाही. विदर्भात पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात चार दिवस पावसाचा ब्रेक, विदर्भात मात्र यलो अलर्ट, या तारखेनंतर पाऊस सक्रीय
| Updated on: Jul 17, 2025 | 8:35 AM

IMD Monsoon Update : महाराष्ट्रात जुलै महिन्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला. विदर्भात पावसाची राहिलेली तूटही भरुन निघाली. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. आता पुढील चार दिवस राज्यात पाऊस ब्रेक घेणार आहे. विदर्भ वगळता कुठेही पावसाचा अलर्ट दिला नाही. विदर्भात पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. राज्यात रेड आणि ऑरेंज अलर्ट कुठेही दिला नाही.

मराठवाड्यात अजून प्रतिक्षा

हवामान विभागाने राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार जून आणि जुलै महिन्यात मराठवाडा वगळता चांगला पाऊस झाला. यावर्षी मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तसेच सध्या तरी मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर वाढण्यास अनुकूल वातावरण नाही, असे हवामान तज्ज्ञ एस. डी. सानप यांनी म्हटले आहे. राज्यात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. पुढील दोन-तीन दिवसांत पुणे शहर आणि शहरालगत मुसळधार पाऊस नाही. मात्र 20 तारखेच्या पुढे पावसाचा जोर वाढणार असल्याचे सानप यांनी म्हटले आहे.

नागपूरसह विदर्भातील काही भागातून पाऊस गायब झाला आहे. आठ ते दहा दिवसांचा पावसाचा खंड पडल्याने शेतकरी चिंतेत आहे. खरीपातील सोयाबीन, कापसाचे पीक सुकायला लागले आहे. पावसाअभावी पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पाऊस नसल्याने उत्पादनावरही परिणाम होणार आहे. सध्या हवामान विभागाने विदर्भात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

गोंदिया जिल्ह्यात 9 ते 11 जुलैदरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावत दीड महिन्याची पावसाची तूट भरून काढली. पण 11 जुलैनंतर पाऊस पुन्हा गायब झाला. मंगळवारी (दि. 15) रात्रीच्या सुमारास जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. पण दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.

सिपना नदीला पूर

अमरावतीच्या मेळघाटमधील सिपना नदीला मोठा पूर आला आहे. यावर्षीच्या पावसातील हा पहिलाच पूर आहे. मेळघाटामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने मेळघाटातून वाहणाऱ्या सिपना नदीला मोठा पूर आला आहे. सिपना नदीसह छोट्या-मोठ्या नद्याही तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत. दरम्यान, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.