खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी निघाले, वाटेत मजा मस्ती सुरु होती अन् अचानक…; नागपुरातील कुटुंबावर शोककळा

राजस्थानमधील सालासर रोडवर झालेल्या भीषण अपघातात कामठी येथील पारसे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. खाटू श्याम बाबांच्या दर्शनाला जात असताना हा अपघात घडला.

खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी निघाले, वाटेत मजा मस्ती सुरु होती अन् अचानक...; नागपुरातील कुटुंबावर शोककळा
nagpur accident
| Updated on: Mar 13, 2026 | 10:24 AM

गेल्या काही दिवसांपासून देशभरातील रस्ते अपघातात प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच आता राजस्थानमधील सालासर रोडवर एक भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात नागपूरच्या एकाच कुटुंबातील आई, वडील आणि मुलगा या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हे तिघेही सहकुटुंब खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी गेले होते. त्याच वेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला.

नेमकं काय घडलं?

कामठी येथील कचरीपुरा भागात राहणारे पारसे कुटुंब आणि त्यांचे काही नातेवाईक एका तवेरा गाडीने राजस्थानमधील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी गेले होते. हे कुटुंब सालासर रोडवर प्रवास करत असताना अचानक त्यांच्या वाहनाला समोरुन येणाऱ्या भरधाव पिकअप गाडीने भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यांच्या तवेरा गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.

या भीषण अपघातात महादेव पारसे, त्यांच्या पत्नी कांता पारसे आणि मुलगा घनश्याम पारसे यांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात चालक मनोज चिंदमवार यांच्यासह आराधना पारसे, पायल पारसे, पल्लवी पारसे, पुनम पारसे, तुषार पारसे आणि पवन बागडे हे ६ जण गंभीर जखमी झाले. एकाच कुटुंबातील आई, वडील आणि मुलाचा अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेनंतर सर्व जखमींना तातडीने सालासर येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची बातमी कामठीतील कचरीपुरा परिसरात पोहोचताच संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या तिघांचे मृतदेह शवविच्छेदनानंतर राजस्थानहून कामठी येथे आणले जाणार आहेत. या घटनेमुळे पारसे कुटुंबावर आणि त्यांच्या मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

खाटू श्याम बाबा धार्मिक स्थळाबद्दल

दरम्यान राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात असलेले खाटू श्याम मंदिर हे भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. पौराणिक कथेनुसार, खाटू श्याम म्हणजे पांडुपुत्र भीमाचा नातू आणि घटोत्कचाचा पुत्र बर्बरीक होत. महाभारताच्या युद्धापूर्वी त्यांनी आपले शीश (मस्तक) श्रीकृष्णाला दान केले होते. त्यांच्या या अजोड त्यागावर प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने त्यांना कलियुगात स्वतःच्या श्याम नावाने पुजले जाण्याचा वर दिला. म्हणूनच त्यांना शीश के दानी असे म्हटले जाते.

हे मंदिर जयपूरपासून साधारण ८० किमी अंतरावर आहे. या ठिकाणी वर्षभर भाविकांची मांदियाळी असते. विशेषतः फाल्गुन महिन्यात येथे मोठा मेळा भरतो. ज्यासाठी लाखो भक्त पदयात्रा करत आणि हातात निशाण (ध्वज) घेऊन दर्शनासाठी येतात. हारे का सहारा, बाबा श्याम हमारा अशी या देवस्थानाची ख्याती आहे. संकटात सापडलेल्या भक्ताला बाबा नक्कीच मार्ग दाखवतात, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे.

Follow Us