सभेत रिकाम्या खुर्च्या पाहून रामदास आठवलेंचा संताप, म्हणाले तिकीट हवे असेल तर…

कल्याण येथील RPI कार्यकर्ता मेळाव्यात रामदास आठवले यांनी रिकाम्या खुर्च्या पाहून तीव्र नाराजी व्यक्त केली. स्थानिक स्वराज्य निवडणुका तोंडावर असताना कार्यकर्त्यांची अनुपस्थिती मित्रपक्षांकडून तिकीट मिळवणे कठीण करेल, असा दम त्यांनी दिला.

सभेत रिकाम्या खुर्च्या पाहून रामदास आठवलेंचा संताप, म्हणाले तिकीट हवे असेल तर...
Ramdas Athawale
| Updated on: Dec 08, 2025 | 12:36 PM

सध्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकाच्या तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच आता कल्याण येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) च्या वतीने एक कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यकर्ता मेळाव्यात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यासपीठावरील रिकाम्या खुर्च्या पाहून तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षाची शाखा आणि मेळाव्यांना कार्यकर्त्यांची उपस्थिती नसेल, तर मित्रपक्षांकडून तिकीट मिळणे कठीण होईल, अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना दम दिला.

ज्या ठिकाणी आपली शाखा आहे, त्या शाखा जागृत असल्या पाहिजेत. मेळावे ठेवले, तर वस्ती-वस्तीची माणसे आली पाहिजेत. खुर्च्या खाली असलेले मेळावे पाहिले, तर कोण तिकीट आपल्याला देणार? असा सवाल रामदास आठवले यांनी केला. इतर पक्षांच्या सभा दुपारच्या वेळेत, म्हणजेच बारा ते दोन वाजता होत असताना, आपला समाज काम करणारा असल्याने मेळाव्याची वेळ योग्य असली तरी, मेळावे मजबूत होणे आवश्यक आहे. मित्रपक्षांना आपली ताकद दाखवण्यासाठी कार्यकर्त्यांनी वस्ती-वस्तीत पोहचावे, शाखा जागृत ठेवाव्यात आणि लोकांना सभेला आणावे, असे स्पष्ट निर्देश आठवले यांनी यावेळी दिले.

आपला गट ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते

यावेळी रामदास आठवले यांनी आपली ताकद छोटी आहे. मात्र कोणाला सत्तेत बसवायचं आणि कोणाला बाहेर काढायचं, ही जबाबदारी आपल्यावर खूप मोठी आहे. आपला गट ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते आणि ज्यांच्या विरोधात जातो त्यांचा सत्यानाश होतो, असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. यावेळी त्यांनी पक्षाचे राजकीय वजन कार्यकर्त्यांना समजावून सांगितले.

म्हणून मी दिल्लीपर्यंत गेलो

आपण 1990 पासून काँग्रेससोबत गेल्यानंतर काँग्रेसला सत्ता मिळाली. त्यानंतर भाजप-शिवसेनेसोबत गेल्यावर त्यांना सत्ता मिळाली. 2012 मधील युतीबद्दल बोलताना ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीनंतर भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आली पाहिजे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. यासाठी नऊ महिने महाराष्ट्रभर फिरून आपण तो धाडसी निर्णय घेतला, ज्याच्या परिणामी शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते निवडून आले. तुमच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते मिळाले म्हणून मी दिल्लीपर्यंत गेलो. तुम्ही नसते, तर दिल्लीपर्यंत पोहोचलो नसतो, असेही रामदास आठवले यांनी म्हटले.