रोहित पवार कोण आहेत? आता दुसरा दादा होणे नाही; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा माजी आमदार भडकला
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे.

आमदार रोहित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना विश्वासात न घेता नागपुरात शेतकऱ्यांच्या मोर्चाची घोषणा केल्याचा दावा केला जात आहे. रोहित पवारांच्या भूमिकेने पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. यामुळे रोहित पवार आणि पवारांची राष्ट्रवादीत दुरावा निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. रोहित पवारांच्या भूमिकेवर आता त्यांच्या पक्षातीलच माजी आमदार रमेश कदम यांनी घणाघात केला आहे.
माजी आमदार आणि मातंग समाज अभ्यासक आयोगाचे अध्यक्ष रमेश कदम म्हणाले, रोहित पवार यांची पात्रता काय आहे? पवार आडनाव काढल्यास रोहित पवार झिरो आहे. महाराष्ट्रात एकच दादा होऊन गेले. अजितदादा पवार म्हणजे दुसरा दादा कदापि शक्य नाही. कॅमेरा म्हणजे दुधारी तलवार आहे. रोहित पवार कॅमेरा नसेल तर ऑफिसमध्येही बसणार नाहीत. रोहित पवार पहिल्या टर्मच्या आमदाराला विधिमंडळात एवढा वेळ बोलायला कसा मिळतो? पहिल्या टर्ममध्ये तर पाय लटपटतात, कामकाज शिकायला 5 वर्षे जातात. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे पहिल्या रांगेत बसतात, तरी रोहित पवारांना जाऊन नमस्कार करावासा वाटत नाही, पक्षाच्या प्रोटोकॉलला चॅलेंज करतात’.
‘मी म्हणजे पार्टी आहे, असा इम्प्रेशन देण्याचा प्रयत्न करतायत. ते अजिबात चालणार नाही. त्यांच्या भाषणात कधी पवार साहेबांचं नाव, कधी राष्ट्रवादीचं नाव नसतं, हे चालणार नाही. सुप्रियाताई नाराज आहेत. हे फक्त आम्ही मीडियात बोलत नाही, पण कार्यकर्त्यांमध्येही नाराजी आहे. तुमच्याकडे पैसा आहे, पण पैसा कामाला येणार नाही. तुमचं एकच भांडवल आहे – आडनावामागे पवार आहे. महाराष्ट्रात एकच दादा : महाराष्ट्रात एकच दादा होऊन गेले – अजित दादा पवार. दुसरा दादा कदापि शक्य नाही. काँग्रेसमध्ये जायचं असेल तर जा, पण पक्षात घाण का करताय? राहुल गांधींनी भेट दिली, कारण आडनावामागे पवार आहे. ग्रामीण भागात आजही प्रत्येक मतदाराला फक्त पवार साहेब दिसतात, बाकी काही नाही. पुढच्या मोर्चात त्यांना पैसे देऊनच भाड्याने माणसं आणावी लागतील, अशा कठोर शब्दात कदम यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली.