फाळणीच्या दंगलीत 20 लाख नागरिक मारले गेले; हे नेहरूंचं पाप, रणजीत सावरकरांचा हल्लाबोल
काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपलं आत्मचरित्र लिहिलं आहे. 'बिलॉन्गिंग: ए जर्नी ऑफ लव' असं या आत्मचरित्राचं नाव आहे. यावर प्रतिक्रिया देताना रणजीत सावरकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपलं आत्मचरित्र लिहिलं आहे. ‘बिलॉन्गिंग: ए जर्नी ऑफ लव’ असं या आत्मचरित्राचं नाव आहे. सोनिया गांधी यांनी आपल्या या आत्मचरित्रामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचासंदर्भात देखील लिखाण केलं आहे. परंतु यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून सोनिया गांधी यांचं आत्मचरित्र असलेल्या ‘बिलॉन्गिंग: ए जर्नी ऑफ लव’ पुस्तकाच्या प्रती फाडण्यात आल्या आहेत. दरम्यान यावरून आता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक संस्थेचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी सोनिया गांधी यांच्या या पुस्तकावर प्रतिक्रिया देताना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर निशाणा साधला आहे.
नेमंक काय म्हणाले रणजीत सावरकर?
सोनिया गांधींचे आत्मचरित्र नेहरू घराण्यातील दुसरे आत्मचरित्र आहे, नेहरूंनी त्यांच्या पुस्तकात अनेक गोष्टी वगळल्या होत्या. नेहरूंनी त्यांच्या आत्मचरित्राचा दुसरा भाग लिहिला नाही. माउंट बॅटन भारतामध्ये आले, त्यांनी दोन वर्षांमध्ये फाळणीची योजना तयार केली. नेहरू त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री देखील होते. फाळणीच्या वेळी जी दंगल उसळलली, त्यामध्ये 20 लाख नागरिक मारले गेले. हे पाप नेहरूंचं आहे, असा आरोप यावेळी रणजीत सावरकर यांनी केला आहे. दरम्यान काँग्रेसवाल्यांनी यापुढे टीका केली तर, नेहरूंचे पूर्ण चरित्र बाहेर काढणार, असा इशाराही यावेळी रणजीत सावरकर यांनी दिला आहे. जर यांनी बोलणं थांबवलं नाही, तर मी अजून सत्य बाहेर काढणार, असंही यावेळी सावरकर यांनी म्हटलं आहे. तसेच गोळवळकर सावरकरांचा सन्मान करायचे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
सोनिया गांधी यांच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी
दरम्यान सोनिया गांधी यांच्या पुस्तकावर महाराष्ट्रात बंदी घालावी यासाठी पूर्व नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून काँग्रेस वातावरण गढूळ करू इच्छित आहे. काँग्रेस नेते वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य करून वातावरण गढूळ करत आहेत. या पुस्तकाच्या माध्यमातून देशात दंगे भडकविण्याचं काम केलं जाऊ शकतं, असं या पत्रामध्ये खोपडे यांनी म्हटलं आहे.