वेटोळे घेऊन दंश करतो… मांजरासारखे डोळे, पुण्यात आढळला अत्यंत दुर्मिळ बेडडोम मांजऱ्या जातीचा साप

पुण्याजवळील भोर तालुक्यातील बनेश्वर परिसरात दुर्मिळ बेडडोम मांजर साप (Boiga beddomei) आढळला. हा साप झाडांवर राहणारा, सौम्य विषारी आणि रात्री सक्रिय असतो. सर्पमित्रांनी त्याला सुरक्षितपणे पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले.

वेटोळे घेऊन दंश करतो... मांजरासारखे डोळे, पुण्यात आढळला अत्यंत दुर्मिळ बेडडोम मांजऱ्या जातीचा साप
पुण्यात आढळला अत्यंत दुर्मिळ जातीचा साप
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 02, 2025 | 1:09 PM

पुण्याच्या भोरमधील बनेश्वर परिसरात अत्यंत दुर्मिळ असा बेडडोम मांजऱ्या जातीचा साप आढळला आहे. करण जाधव या शेतकऱ्याच्या दुचाकीच्या पुढील कॅपमध्ये हा साप आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. हा साप सौम्य विषारी मानला जातो. हा साप वेटोळे करून बसतो, अचानक झेप घेऊन दंश करतो. या सापाचं हे रुप पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. दरम्यान, सर्प मित्रांनी या सापाला पकडून त्याच्या मूळ अधिवासात त्याला सोडलं आहे. झाडांवर राहणारा, सौम्य विषारी आणि रात्री सक्रिय असलेला हा साप सह्याद्रीच्या घनदाट जंगलातच क्वचित आढळतो.

रविवारी संध्याकाळी 7.30 वाजता पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशनचे कार्याध्यक्ष सदस्य विशाल शिंदे यांना शेतकरी करण जाधव यांच्याकडून कॉल आला. बनेश्वर परिसरात घराजवळ दुचाकीच्या कॅपमध्ये एक साप आढळून आल्याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने सर्पमित्र विलास धोंगडे, संतोष पाटील आणि श्रीकांत खेडकर यांना घटनास्थळी पाठवले. सर्वांनी घटनास्थळी पोहोचून काळजीपूर्वक पाहणी केली असता एक अति दुर्मिळ प्रजातीचा साप ‘बेडडोम मांजऱ्या साप’ (Boiga beddomei) आढळून आला.

लाजाळू आणि मानवापासून दूर राहणारा

झाडांवर राहणारा, सौम्य विषारी, आणि रात्री सक्रिय असलेला हा साप सह्याद्रीच्या घनदाट जंगलातच क्वचित आढळतो. त्याचे डोळे मांजरासारखे मोठे असतात म्हणून त्याला ‘Cat Snake’ हे नाव मिळाले आहे. सुमारे  1 मीटर लांबीचा, फिकट पट्टे असलेला हा साप अत्यंत लाजाळू आणि मानवापासून दूर राहणारा असतो.

पहिलीच नोंद

सर्पमित्र विलास धोंगडे आणि त्यांच्या पथकाने अत्यंत शिताफीने सापाला सुरक्षितपणे पकडले आणि नसरापूर येथील बनेश्वर वनउद्यानाच्या मागील बाजूस त्याच्या नैसर्गिक अधिवासात पुनर्वसन केले. विशेष म्हणजे, अत्यंत दुर्मिळ प्रजातीचा साप आढळण्याची ही भोर तालुक्यातील पहिलीच नोंद आहे.

वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात

सर्पमित्र विलास धोंगडे यांनी याबाबत अधिक माहिती दिली. आपल्या परिसरात अतिशय दुर्मिळ वन्यजीव आहेत. मात्र अलीकडे डोंगराळ भागात फार्महाऊस, रो-हाऊस, हॉटेल्स आणि इतर बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अनेक झाडांची कत्तल होऊन पर्यावरणाचे संतुलन ढासळत आहे. उन्हाळ्यात वाढलेले तापमान याचेच द्योतक आहे, असं विलास धोंगडे म्हणाले. डोंगराळ भागात कोणतेही बांधकाम, उत्खनन यावर त्वरित बंदी आणावी, जेणेकरून जैवविविधता टिकून राहील आणि भविष्यातील पिढ्यांसाठी निसर्गाचे रक्षण होईल, अशी मागणीही धोंगडे यांनी केली आहे.

बेडडोम मांजर सापाविषयी माहिती:

वैज्ञानिक नाव : Boiga beddomei

मराठी नाव : बेडडोम मांजर साप / बेडडोम वेलसर्प

वास्तव्य : झाडांवर राहणारा, रात्री सक्रिय होणारा

विषारी : सौम्य विषारी, मानवासाठी फारसा धोका नाही

संरक्षण : कायद्याने संरक्षित, त्रास देणे किंवा मारणे बेकायदेशीर