
सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेने मोठा दणका दिला आहे. आरबीआयने बँकिंग नियमन अधिनियम 1949च्या कलम 35(अ) आणि 56 नुसार सहा महिन्यांसाठी बँकेच्या व्यवहारवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे आता समर्थ सहकारी बँकेला आरबीआयच्या पूर्व परवानगीशिवाय नवीन कर्ज देता येणार नाही, तसेच ठेवीही स्वीकारता येणार नाहीत. त्याबरोबर ठेवीदारांना आपल्या खात्यातून पैसेही काढता येणार नाहीत. यामुळे बँकेच्या ग्राहकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
समर्थ बँकेवरील या कारवाईमुळे ठेवीदारांची चिंता वाढली आहे. आज सकाळपासून ठेवीदार बँकेत गोंधळ घालत आहेत. किरण मोहिते या निवृत्त मुख्याध्यापिका असून त्यांची पेन्शन बँकेत जमा होते. जमा झालेल्या पेन्शन वरच त्यांच्या कुटुंबाची गुजरान आहे. मात्र कालपासून त्यांचे पैसे निघत नसल्याने त्या हतबल झाल्या आहेत. मोहिते यांनी सांगितले की, ‘माझी पेन्शन स्टेट बँकेत जमा होते, मात्र मी काही लोकांना गॅरेंटेड राहिल्यामुळे त्यावर मर्यादा येत होत्या. त्यामुळे मी माझी टेन्शन माझ्या मिस्टरांच्या खात्यावर वळवली आहे. त्यांनी कालच सहा वाजता माझ्या खात्यावर 40 हजार रुपये पाठवले. पंधरा मिनिटांनी मी ते पैसे फोनपे द्वारे घर भाडे आणि इतर खर्चासाठी पाठवण्याचा प्रयत्न केला मात्र ते झाले नाहीत अशी माहिती दिली.
आणखी एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ‘माझ्या मुलीच्या नावावर 9.50 लाख रुपये मी ठेवले होते. तसेच 80 हजार रुपये चालू खात्यात होते. आता बँकेने बाहेर बोर्ड लावला आहे की सभासद आणि हितचिंतकांनी सहकार्य करावे. आमचं म्हणणं आहे की, त्यांनी आम्हाला लेखी स्वरुपात द्यावं की एवढ्या वेळ दिवसात पैसे परत करतो. मात्र ते तसे द्यायला तयार नाहीत.’
या सर्व प्रकरणावर बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले की, बँकेवर आरबीआयने अचानक निर्बंध लादले. आमच्या बँकेची आर्थिक स्थिती व्यवस्थित असताना देखील हे निर्बंध लादले हे आम्हाला कळले नाही. बँकेकडे 70 ते 80 कोट रुपयांची ठेव आहे. बँकेतून कोणत्याही प्रकारे कोणाही जवळच्या खातेदाराला यापूर्वी रक्कम दिले गेलेली नाही. अचानकपणे RBI ने ही कारवाई केली.
पुढे बोलताना अत्रे म्हणाले की, ‘गेल्या दोन महिन्यात समर्थ सहकारी बँकेने लक्षणीय प्रगती केली आहे. यात शेअर कॅपिटल दुप्पट झालं, लिक्विडीटी 60 कोटीने वाढली, सिक्युरिटीसाठी 60 कोटी रुपये भर घातली आहे. आम्ही समर्थ सहकारी बँकेवर लावलेले निर्बंध हटवण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत. बँकेच्या सभासदांना विनंती करतो की, बँकेवर विश्वास ठेवा, बँकेवरील लावलेले निर्बंध दूर करून बँक पूर्ववत करू. ‘
वैद्यकीय आणि इतर सेवांसाठी खातेदारांना बँकेतून रक्कम काढण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी आम्ही मेलच्या माध्यमातून आरबीआयशी संवाद साधत आहोत. याबद्दल दोन दिवसात आरबीआयकडून उत्तर येईल. काही गुंतवणूकदारांबरोबर आमचं बोलणं झालं आहे. अडीचशे ते तीनशे कोटी रूपयांची गुंतवणूक येणार आहे. त्यातील सव्वाशे कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे अशी माहितीही अत्रे यांनी दिली आहे.