पायलटवर कोणाचा दबाव होता का? रोहित पवारांच्या ट्वीटने खळबळ, संशयाची सुई कोणाकडे?

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक संशय व्यक्त केला आहे. अहमदाबाद अपघाताचा दाखला देत, बारामती अपघातावेळी वैमानिकावर कोणाचा दबाव होता का? याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पायलटवर कोणाचा दबाव होता का? रोहित पवारांच्या ट्वीटने खळबळ, संशयाची सुई कोणाकडे?
rohit pawar ajit pawar plane crash
| Updated on: Feb 13, 2026 | 11:51 AM

राज्याचे माजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला तीन आठवडे उलटले आहेत. तरीही अद्याप महाराष्ट्र सावरलेला नाही. अजित पवारांचे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे एका विमान अपघात निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. आता या दुर्दैवी घटनेभोवती संशयाचे धुके गडद होऊ लागले आहे. या अपघातानंतर आता त्यांचा पुतण्या आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. हा एक नियोजित कट असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. त्यातच रोहित पवार यांनी आता आणखी दोन ट्वीट करत याबद्दल अजून एक संशय व्यक्त केला आहे.

रोहित पवार यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी सरकारकडे चौकशीची विनंती केली आहे. तसेच त्यांनी सरकारला अनेक सवाल करत VSR विमान कंपनीच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले आहे.

रोहित पवारांचे ट्वीट

निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅक लीस्ट केलं जातं.. चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ केलं जातं, मग जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपनीवर कारवाई का नको? हाच न्याय VSR कंपनीलाही लावून आतापर्यंत गुन्हा दाखल करून कंपनीला टाळंही लावायला पाहिजे होतं. पण तसं होताना का दिसत नाही, हे न समजणार कोडं आहे.. की कंपनीचा मालक आणि पार्टनर यांचं एवढं वजन आहे का, ज्यामुळं सरकारही त्यांच्यावर कारवाईला घाबरतं? असा सवाल रोहित पवारांनी केला आहे.

देशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, सेलिब्रिटी, सर्वपक्षीय राजकीय नेते या VSR कंपनीची सेवा घेत असतील तर त्यांचा आणि पायलटसह अन्य कर्मचाऱ्यांचाही जीव तेवढाच महत्त्वाचा नाही का? त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की, तातडीने या कंपनीवर कारवाई करून तिच्या देशातील सेवेला बंदी घालावी. अहमदाबाद विमान अपघातातात पायलटनेच फ्यूल स्विच बंद केल्याची बातमी बघता, अजितदादांच्या विमान अपघाताबाबत व्यक्त केलेला संशय अधिक बळावला. बारामती अपघाताबाबत देखील यादृष्टीने तपास होऊन पायलटवर कोणाचा दबाव होता का ? याबाबत कसून, सखोल आणि निष्पक्ष #तपास_झालाच_पाहिजे, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.

राजकीय वर्तुळात मोठी पोकळी

दरम्यान अजित पवारांसारख्या निधनाने राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. असे असतानाच आता रोहित पवारांच्या या दाव्यांमुळे प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणातील तांत्रिक बाबी आणि विमान कंपनीची पार्श्वभूमी पाहता, सरकार आता यावर काय भूमिका घेते आणि चौकशीचे आदेश देते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.