Rohit Pawar: शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाजपचा हस्तक, रोहित पवारांचा खळबळजनक दावा; ‘तो’ नेता कोण?
आपल्या पक्षातील काही खासदार आणि आमदार सत्तेसोबत जाण्याचा विचार करत असल्याने किंवा काहींना सत्तेसोबत जाण्यास भाग पाडलं जात असल्याने त्यांचा आपल्यावर दबाव असणं स्वाभाविक आहे, पण ज्यांना जायचं असेल त्यांना खुशाल जाऊ द्या. त्यांचे खरे चेहरे देखील समोर येऊ द्या कुणी गद्दारी करणार असेल तर असे गद्दार आमदार, खासदार इथली स्वाभिमानी जनता पुन्हा कदापि निवडून देणार नाही, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.

Rohit Pawar Letter To Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी डिलिमिटेशनच्या विरोधात भूमिका घ्या असे म्हणत खासदार सुप्रिया सुळेंना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये रोहित पवार यांनी शरद पवार यांच्यावर होणारी टीका अन् पुरोगामी भूमिकेवरुन परखडपणे मत मांडले आहे. त्याचबरोबर रोहित पवार यांनी या विधेयकाला समर्थन देण्यामागे कोणाचा दबाव आहे, असा सवाल करत एक खळबळजनक दावा केला आहे. नेमकं काय म्हणालेत रोहित पवार? वाचा…
‘त्यांचे खरे चेहरे जगासमोर येऊ द्या…’
“साहेब आजारी असताना, त्यांच्यामागं घेतल्या जाणाऱ्या या निर्णयामुळं त्यांच्या आयुष्यभराच्या या तपाचा भंग होऊ नये, हीच माझी अत्यंत प्रामाणिक भावना आहे. साहेबांच्या निष्ठेवर आणि पुरोगामी प्रतिमेवर कोणताही डाग लागू न देण्याची जबाबदारी आज आपल्या सर्वांच्याच खांद्यावर आहे. आपल्या पक्षातील काही खासदार आणि आमदार सत्तेसोबत जाण्याचा विचार करत असल्याने किंवा काहींना सत्तेसोबत जाण्यास भाग पाडलं जात असल्याने त्यांचा आपल्यावर दबाव असणं स्वाभाविक आहे, पण ज्यांना जायचं असेल त्यांना खुशाल जाऊ द्या. त्यांचे खरे चेहरे देखील समोर येऊ द्या कुणी गद्दारी करणार असेल तर असे गद्दार आमदार, खासदार इथली स्वाभिमानी जनता पुन्हा कदापि निवडून देणार नाही, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.
‘आपल्याच पक्षातील भाजपचा हस्तक…’
तसेच “या विधेयकाला पाठिंबा देण्याबाबतच्या सध्या सुरु असलेल्या चर्चा बघितल्या तर आपल्याला देखील त्यासाठी जबाबदार धरलं जातंय. दुसरीकडं तुमचा चेहरा पुढं करून खऱ्या अथनि यामागे असलेला आपल्याच पक्षातील भाजपचा हस्तक नेता मात्र शांतपणे बसला असून आपली प्रतिमा मात्र खराब होतेय. आदरणीय ताई, मी तुमच्या डोळ्यातली भावना बघितलीय, तुमच्या मनात देखील आमच्याप्रमाणेच विचार आहे, पण तुमच्यावर दबाव येत असावा, असा खळबळजनक दावाही रोहित पवार यांनी केला आहे.
पक्षातील आमदार-खासदारांना आवाहन!
दरम्यान, मला आमदार आणि खासदारांनाही सांगायचंय की, दबावापुढं झुकून संविधानाशी द्रोह करणार नाही, हे तुम्हीही हिंमत करुन दाखवून द्या. यासंदर्भात तुम्हालाही भूमिका स्पष्ट करावी लागेल. धाडस दाखवावं लागेल. आपला पक्ष लोकशाहीचा आदर करणार आहे. त्यामुळे उघड मतं मांडावीत. पण आपण डोळे झाकले म्हणजे लोकांचं लक्ष आपल्याकडं नाही, असं कुणीही समजू नये. आपण ठाम भूमिका घेतली तर ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं त्याचा विश्वासघात होणार नाही, शिवाय त्याचे प्रश्नही बाजूला सरणार नाहीत, असं आवाहनही रोहित पवार यांनी केले आहे.