Rohit Pawar : त्यांची बौद्धिक क्षमता मला माहित्येय, रोहित पवारांनी थेट भाजपच्या बड्या नेत्याबद्दल वापरले असे शब्द
Rohit Pawar : "त्यांची बौद्धिक क्षमता मला माहित्येय पण यानिमित्ताने राज्यात पडलेल्या दुष्काळासोबतच घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीच्या आणि त्यांच्या कार्यालयाच्या बौद्धिक दुष्काळाचंही त्यांनी महाराष्ट्राला दर्शन घडवलं" अशी टीका रोहित पवारांनी केली.

महाराष्ट्रात सध्या जिल्हा बँक निवडणुकीचं वारं वाहत आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षातील बड्या नेत्यांकडून ही निवडणूक लढवण्याची तयारी सुरु आहे. त्यात काही ठिकाणी प्रस्थापित पक्षातील नेते परस्परासमोर उभे ठाकणार आहेत. विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्यावर याच निवडणुकीवरुन रोहित पवार यांनी बोचरी टीका केली आहे.
“तीन अपत्ये असूनही विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत. विधानपरिषदेसारख्या कायदेमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या सभापतींनाच कायदे-नियम माहित नसतील तर याला काय बोलावं?” असं रोहित पवार म्हणालेत.
“त्यांची बौद्धिक क्षमता मला माहित्येय पण यानिमित्ताने राज्यात पडलेल्या दुष्काळासोबतच घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीच्या आणि त्यांच्या कार्यालयाच्या बौद्धिक दुष्काळाचंही त्यांनी महाराष्ट्राला दर्शन घडवलं. एकतर कर्जत-जामखेडमध्ये केवळ मला विरोध करण्यासाठी आणि मतदारसंघात गुंतवून ठेवण्यासाठीच त्यांना पद देण्यात आलं हे सूर्यप्रकाशाइतकं ढळढळीत सत्य आहे” असं रोहित पवार म्हणाले.
‘हाथ खाली और बजाओ ताली…’
“पण त्यांना साधे कायदे-नियमही माहित नसतील तर अशा व्यक्तीला सभापती पदावरून तातडीने हटवून गणपती मंडळाच्या किंवा स्थानिक उत्सव मंडळाच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी मुक्त करावं. यामुळं सभापतीपदासारख्या प्रतिष्ठेच्या पदाची अप्रतिष्ठा आणि महाराष्ट्राचं नुकसान होणार नाही” असं रोहित पवार म्हणाले. “एकतर सगळीकडंच प्रा. राम शिंदे यांचा झेंडा लावला जात असेल तर भाजपच्या कार्यकर्त्यांची अवस्थाही आज ‘हाथ खाली और बजाओ ताली…’ अशीच झाली. त्यामुळं त्यांना सभापती पदावरून हटवलं तर किमान कायद्याची जाण असलेल्या हुशार आमदाराला तरी या पदावर काम करण्याची संधी मिळेल” अशी टीका रोहित पवार यांनी केली.
सुजय विखेंच्या वक्तव्यावर राम शिंदे यांचा जोरदार टोला
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीवरून राम शिंदे-सुजय विखे यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले आहे. सुजय विखेंच्या वक्तव्यावर राम शिंदे यांनी जोरदार टोला लगावला आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या बिनविरोध निवडणुकीच्या भूमिकेचा सन्मान केला पाहिजे असे राम शिंदे म्हणाले.