‘देशात तोपर्यंत धोका कायम असणार…’, पाकिस्तानसंदर्भात सरसंघचालकांचे महत्वाचे विधान

सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरमधून पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला. तसेच बदलत्या काळानुसार बदल करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, युद्धाचे तंत्र बदलले आहे. युद्धाची पद्धत बदलली आहे. घरात बसून ड्रोन सोडले जात आहे. क्षेपणास्त्र डागले जात आहे. युद्धाचे नवनवीन तंत्रज्ञान आले आहे.

देशात तोपर्यंत धोका कायम असणार..., पाकिस्तानसंदर्भात सरसंघचालकांचे महत्वाचे विधान
mohan bhagwat
| Updated on: Jun 06, 2025 | 11:55 AM

जोपर्यंत पाकिस्तानचा दुटप्पीपणा दूर होत नाही, तोपर्यंत देशात दहशतवादाचा धोका कायम राहील. यामुळे भारताला सुरक्षेच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे लागेल. आता युद्धाचे स्वरुप बदलले आहे. यामुळे देशात नवीन तंत्रज्ञानावर संशोधनही झाले पाहिजे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय पातळीवरील कार्यकर्ता विकास वर्गाचा समारोप नागपूरमधील रेशीमबागेत झाला. देशभरातून आलेल्या 840 स्वयंसेवकांचा हा वर्ग 25 दिवस चालला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी या वर्गाला मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी देशभर दुःख आणि संतापाची लाट पसरली होती. दहशतवाद्यांवर कारवाई झाली, अशी प्रत्येकाची भावना झाली होती. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून आपल्या सैन्याची क्षमता जगाला दाखवून दिली. पाकिस्तानमधील दहशतवादी तळ नष्ट केली. परंतु पाकिस्तानचा वाकडेपण सुरूच आहे. पाकिस्तान बुडत नाही, तोपर्यंत त्यांची खोड जाणार नाही, तोपर्यंत हे भीती वातावरण सुरूच राहील, असे सरसंघचालकांनी म्हटले.

धर्मांतर घडवणे चुकीचे

धर्मांतरणावर बोलताना मोहन भागवत म्हणाले, जबरदस्तीने धर्मांतर करणे म्हणजे एका प्रकारे हिंसाच आहे. जोर जबरदस्तीने धर्मांतर घडवणे चुकीचे आहे. आपण आपला धर्म पाळत असताना आपली एकता ही महत्त्वाची आहे. भारताच्या या स्वातंत्र्याचे प्रयोजन एकता आहे. त्यासाठी आपली एकता, विविधता सांभाळून सगळ्यांचा सन्मान केला पाहिजे.

संघाचे काम हळूहळू पडणाऱ्या पावसासारखे

आजच्या बदलेल्या तंत्रज्ञानावर भागवत यांनी म्हटले की, आता युद्धाचे तंत्र बदलले आहे. युद्धाची पद्धत बदलली आहे. घरात बसून ड्रोन सोडले जात आहे. क्षेपणास्त्र डागले जात आहे. युद्धाचे नवनवीन तंत्रज्ञान आले आहे. नवीन तंत्रज्ञानासोबत जाताना आपणास आत्मनिर्भर व्हावे लागणार आहे. आपल्या देशात विविधता आहे. तसेच समस्याही आहे. एक समस्या दुसऱ्याच्या कधी लक्षात येत नाही. प्रत्येकाने शांत डोक्याने विचार केला पाहिजे. वाईट भाषा वापरणारे लोक आहेत. त्यांच्या षड्यंत्रात कोणी येऊ नये. विविधतेत एकतेचा परिचय दिला पाहिजे.

संघाच्या कामाबाबत बोलताना सरसंघचालक यांनी सांगितले की, काही काम मुसळधार पावसासारखा आहे. ते येतात. इकडे तिकडे नुकसान करतात. त्याचा फायदा शेतीला होत नाही. पण संघाचे काम हळूहळू पडणाऱ्या पावसासारखे आहे. जमिनीत असणाऱ्या बियाण्याला फायदा करुन दिला जातो. त्यातून उत्पादन मिळते. संघाचा ही पद्धती आहे.