
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे कारनामे समोर आले आहेत. त्याला एका महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरात सोबतचे फोटो आणि त्याची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ समोर आला होते. त्यामुळे रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर आता रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर त्यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
राजीनाम्यानंतर पत्रकारांशी बोलताना रुपाली चाकणकर यांनी म्हटले की, ‘खरात पती-पत्नीला मी आणि माझ्या कुटुंबाने गुरू मानलं होते, त्यामुळे आम्ही विविध कार्यक्रमांना हजर रहायचो. मी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पाद्यपुजा केली होती, माझ्या पतीनेही पूजा केली, हा 6 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ होता. आज सोबत असलेले लोक पुढे कसे वागतील हे आपल्याला माहिती नसतं. माहिती समजताच मला धक्का बसला.
पुढे बोलताना चाकणकर म्हणाल्या की, ‘पोलिसांनी खोलवर तपास करावा हे मी सांगितले आहे. मी पोलिस महासंचालकांची भेट घेतली आहे, त्यांनी तपासाबाबत पत्र दिलं आहे. मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनाही पत्र दिलं आहे. मी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली आहे. मी अध्यात्मिक श्रद्धेतून खरातवर विश्वास ठेवला होता पण खरातची दुसरी बाजू माहिती नव्हती. जे काही घडलं आहे ते अतिशय चुकीचं आणि घाणेरडं कृत्य आहे. त्याच कुठेही आम्ही समर्थन करणार नाही. पोलिसांनी सखोल तपास करावा, पोलिसांनी आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही केली आहे.’
रुपाली चाकणकर यांनी राजीनामा पत्रात म्हटले की, मी, सौ. रुपाली निलेश चाकणकर, वरील विषयान्वये आपणांस विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की, दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा ह्या पत्राद्वारे आपणांस सादर करत आहे.
आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केले त्याबद्दल मी आपली व सर्व सहकाऱ्यांची शतशः ऋणी आहे. भविष्यातही आपले असेच सहकार्य राहील असा मला विश्वास आहे. तरी आपण माझा अध्यक्षा, राज्य महिला आयोग ह्या पदाचा राजीनामा स्वीकारावा अशी आपणांस नम्र विनंती आहे.