सुनेत्रा पवारांना मोठा झटका बसणार? अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार; बड्या नेत्याच्या भाकिताने खळबळ
Suentra Pawar NCP Split: अजितदादांच्या राष्ट्रवादीतील कलह चव्हाट्यावर आला आहे. पक्षाच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या निवडीलाच आव्हान देण्यात आले आहे. तर आता या बड्या नेत्याने दादांची राष्ट्रवादी फुटणार असल्याचा मोठा दावा केल्याने राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : अजितदादांच्या राष्ट्रवादीतील वादाने मोठा पेच निर्माण झाला आहे. थेट अध्यक्षांच्या निवडीवरच आक्षेप घेण्यात आला आहे. सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीला आव्हान देण्यात आले आहे. यापूर्वी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार विरुद्ध सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल असे नाराजी नाट्य रंगले होते. तर या बड्या नेत्याने या सर्व घडामोडींवर भाष्य करताना दादांची राष्ट्रवादी (Suentra Pawar NCP Split) लवकरच फुटणार असल्याचा दावा केला आहे. या नवीन दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.
दादांची राष्ट्रवादी लवकरच फुटणार
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील कलहावर मोठे भाष्य केले आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षात सगळं काही अलबेल नाही. शिंदेंच्या शिवसेनेतही धुसफूस आहे. गँगअप सुरु आहे. यांच्यात टोळी युद्ध सुरु झालंय, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्याचवेळी तुम्हाला लवकरच हा पक्ष फुटलेला दिसेल असे मोठे भाकीत केले. त्यांच्या या दाव्याने राजकीय खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी पक्षातील वाद चव्हाट्यावर आल्यानंतर इतर पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहे. तर शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार असल्यावरही त्यांनी मत मांडलं. ज्या पक्षासंदर्भात या चर्चा सुरु त्यांनी बोलणं अपेक्षित होतं असे ते म्हणाले. तर सुप्रिया सुळेंनी यासंदर्भात मत मांडलंय असे सपकाळ यांनी सांगितले.
आता हात वर केले
राम मंदिरातील दान चोरी प्रकरणात हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्रमक भूमिका मांडली. महासचिव, सचिव यांच्यापूर्ता हा घोटाळा मर्यादित नाही. संपूर्ण खेळ अंगाशी आल्यावर तो मी नव्हेच अशी भूमिका विश्वस्त मंडळाने घेतल्याचा आरोप त्यांनी केला. संघात हिंमत असेल तर त्यांनी विश्वस्त समितीतील सदस्यांना संघातून निष्काशीत करावे अशी मागणी सपकाळ यांनी केली.
शिंदे पिता-पुत्रावर टीका
17 जुलै रोजी केंद्रीय कॅबिनेटचा विस्तार होत आहे. त्यात कॅबिनेटपदी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वर्णी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यावर सपकाळ यांनी टीका केली आहे. पैसा आणि संपत्तीच्या बाबतीत त्यांची परिस्थिती कुठे ठेवू आणि कुठे नको अशी झाली आहे. एकनाथ शिंदे यांना स्वतःला मुख्यमंत्री आणि मुलाला मंत्री करायचं आहे अशी टीका सपकाळ यांनी केली.
राहुल गांधींचं भाजपसमोर आव्हान
अरबी समुद्रात या सरकारने शिवस्मारकाचं भूमिपूजन केलं. पण स्मारकाचा अद्याप कसलाही पत्ता नाही. तर मुंबईतील इंदूमिल मधील बाबासाहेबांचं स्मारक झालं नाही असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. 2029 मध्ये राऊल गांधींचं भाजपससमोर आव्हान असेल, असा दावाही सपकाळ यांनी केला.