
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धारशिव करण्याचा निर्णयाला केंद्र आणि राज्य सरकाराने परवानगी दिली आहे. त्यानंतर आता दोन्ही जिल्ह्यांची नावे बदलली आहेत. यासाठी राज्य शासनाला मोठा खर्चही करावा लागणार आहे. सर्व शासकीय दप्तरी व कागदोपत्री नवीन नावे करावी लागणार आहेत. त्यासाठी नवीन कागदपत्रे छापावी लागणार आहेत. रेल्वे स्थानकापासून शहरातील विविध ठिकाणी व जिल्ह्यात सर्वत्र असणाऱ्या नावांच्या पाट्या बदलाव्या लागणार आहेत. हा सर्व खर्च मोठा असणार आहे. परंतु या जिल्ह्यांमधील नागरिकांनाही खर्च करावा लागणार आहे.
छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव ही नावे झाल्यानंतर नागरिकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण, लोकांच्या कागदपत्रांमध्ये जुनी नावे नोंदवली गेली आहे. आता या दोन जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या कागदपत्रांमध्ये जिल्ह्यांची बदललेली नावेही अपडेट करावी लागणार आहेत.
नागरिकांना करावी लागणार कागदपत्रे अपडेट
आधार कार्ड, बँक पासबुक आदींचा समावेश आहे. आधार कार्डमधील पत्ता बदलण्यासाठी त्यांना आधार कार्ड केंद्रावर जावे लागेल. येथे त्यांना एक फॉर्म मिळेल, तो भरल्यानंतर त्यांना तो नगरसेवक किंवा ग्रामपंचायतीचा शिक्का मारून जमा करावा लागेल. यानंतर बायोमेट्रिक पद्धतीने पत्त्यात बदल करावा लागेल. यासाठी 50 ते 100 रुपये मोजावे लागतील.
बँकेत होणार बदल
बँक कर्मचार्यांच्या मते, बँकेचे कामकाज प्रामुख्याने खाते क्रमांक आणि आयएफसी कोडद्वारे केले जाते. शासनाकडून सूचना आल्यानंतर प्रणालीद्वारे उस्मानाबाद शाखेचे नाव धाराशिव येथून अपडेट करता येईल. त्यानंतर ग्राहकांना धाराशिव नावाचे पासबुक चेकबुक मिळेल. यापूर्वी चेक उस्मानाबादच्या नावावर असला तरी ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे लोकांना पैशांच्या व्यवहारात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
न्यायालयात याचिका
1 फेब्रुवारी रोजी, मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही शहरांचे नामांतर करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाला तात्काळ स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी मान्य करण्यास नकार दिला. मात्र, यासंदर्भात पुढील सुनावणी २७ तारखेला ठेवली आहे.
खासदाराचे आंदोलन
नामांतरास विरोध करण्यासाठी खा. इम्तियाज जलील शनिवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत साखळी उपोषण करणार आहे. हे उपोषण कोणत्याही राजकीय पक्षाच्या अंर्तगत केले जाणार नाही. तर ज्यांना ज्यांना औरंगाबाद हेच आपल्या शहराचं नाव असावं, असं वाटतं, असे सगळे नागरिक या उपोषणाला येतील. अशा सर्व नागरिकांनी स्वेच्छेने आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहान खा. इम्तियाज जलील यांनी केलंय.