ती परत आलीये…. सांगलीकर रात्रभर जागेच, नेमकी दहशत कोणाची?

सांगलीच्या विश्रामबाग परिसरात महिलांच्या एका टोळीने चोरीच्या घटना घडवल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या टोळीची रेकी करताना दिसत आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

ती परत आलीये.... सांगलीकर रात्रभर जागेच, नेमकी दहशत कोणाची?
sangli cctv
| Updated on: Jan 25, 2025 | 5:20 PM

Sangli Crime Female Gang Active : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. महाराष्ट्रात हत्या, अत्याचार, दरोडा, खून यांसारख्या घटना सतत घडत आहेत. त्यातच आता सांगलीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हार्ट ऑफ सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीच्या विश्रामबागमध्ये महिलांची टोळी सक्रीय असल्याचे पाहायला मिळत आहे. या टोळीकडून विविध ठिकाणी रेकी करण्यात आली आहे. सध्या सीसीटीव्हीमध्ये ही टोळी कैद झाली आहे. त्यामुळे सांगलीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

परिसरात घबराटीचे वातावरण

सांगलीच्या विश्रामबाग मधील एसटी कॉलनी परिसरात आणि राम मंदिरमध्ये पहाटेच्या सुमारास महिलांच्या टोळीकडून चोरीसाठी रेकी केली जात आहे. असा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आठ ते दहा महिला पाहायला मिळत आहेत. या महिला तोंडाला मास्क लावून एखाद्या सोसायटीत किंवा बंगल्यात शिरतात. यानंतर त्या चोरी करुन निघून जातात. यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महिलांच्या टोळीची दहशत निर्माण

सांगलीच्या विश्रामबाग परिसरात गेल्या काही दिवसापासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. विश्रामबाग येथील प्रगती कॉलनीत एका चोरट्याने घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या भागातील नागरिकांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या टोळीचा अद्याप छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यातच आता महिलांच्या टोळीची दहशत निर्माण झाली आहे.

व्हिडीओ व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल

साधारण आठ ते दहा महिला या मध्यरात्री रिक्षातून येतात. त्या परिसरातील बंगल्यांची पाहणी करतात, असा एक व्हिडीओ व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल होत आहे. यासोबत नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असा मेसेज व्हॉट्सअॅप ग्रुपवर फिरत आहे. हे सीसीटीव्ही फुटेज काही लोकांनी विश्रामबाग पोलीससह स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलीस निरीक्षकाकडे दिले आहे. पोलीस अधीक्षक यांनी याबाबत माहिती देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक यांनी याचा छडा लावण्याचे आदेशही पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले आहेत.