इराण-इस्रायल युद्धाचा महाराष्ट्राला फटका, पुणे, सांगलीत नेमकं काय घडलं?

आखाती देशांतील युद्धामुळे सांगलीतील १५ हजार टन द्राक्षांची निर्यात ठप्प झाली आहे.. विधानसभेत आमदार अतुलबाबा भोसले यांनी अफगाणिस्तानमार्गे येणाऱ्या 'चायनीज' बेदाण्यावर बंदी घालण्याची आणि द्राक्ष उत्पादकांना अनुदान वाढवण्याची मागणी केली आहे.

इराण-इस्रायल युद्धाचा महाराष्ट्राला फटका, पुणे, सांगलीत नेमकं काय घडलं?
iran israel news
| Updated on: Mar 05, 2026 | 8:24 AM

सध्या इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाचा परिणाम आता महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे आखाती देशांकडे जाणारी द्राक्ष निर्यात पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. यामुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि व्यापारी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्गांवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. सध्या निर्यातीचे हे चक्र थांबल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. आता द्राक्ष बागायतदारांसमोर कर्जाचे हप्ते कसे फेडायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सांगली जिल्ह्याची ओळख द्राक्ष पंढरी म्हणून आहे. दरवर्षी येथून हजारो टन द्राक्षे आखाती देशात UAE, सौदी अरेबिया, कतार निर्यात होतात. मात्र, सद्यस्थितीत सांगलीतील कोल्ड स्टोअरेजमध्ये ३५० कंटेनर द्राक्षे साठवलेली आहेत. नवीन माल ठेवण्यासाठी आता जागा शिल्लक नाही. जवळपास ७०० कंटेनर होतील, इतकी द्राक्षे अद्याप बागेतच आहेत. जर ही द्राक्षे वेळेत काढली नाहीत, तर ती खराब होण्याची भीती आहे. मुंबईच्या न्हावा शेवा बंदरात ३०० कंटेनर अडकले आहेत. जहाजांचे वेळापत्रक कोलमडल्याने आणि विम्याचे दर वाढल्याने व्यापाऱ्यांनी माल पाठवणे थांबवले आहे.

द्राक्ष शेतीसाठीचे अनुदान तातडीने वाढवावे

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपा आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी द्राक्ष आणि बेदाणा उत्पादकांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. आमदार भोसले यांनी निदर्शनास आणून दिले की, अफगाणिस्तानमार्गे भारतात चायनीज बेदाणा मोठ्या प्रमाणावर येत आहे. हा बेदाणा अत्यंत स्वस्त असल्याने सांगली आणि तासगावच्या बेदाण्याला भाव मिळत नाही. हा बेदाणा नेमका कोणत्या मार्गाने आणि कशा प्रकारे भारतात येतोय, याची चौकशी करून सीमाशुल्क विभागाने (Customs) कडक पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.

द्राक्ष बागायतदारांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे राज्य सरकारने द्राक्ष शेतीसाठी आणि निर्यातीसाठी दिले जाणारे अनुदान तातडीने वाढवावे, अशी आग्रही मागणी त्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली.

भाजीपाला आणि फळे आता परत नेण्याची वेळ

सध्या पुणे विमानतळावरही शुकशुकाट पाहायला मिळत आहे. हवाई मार्गे होणारी निर्यातही पूर्णपणे ठप्प झाली आहे. दुबई आणि अबू धाबीची आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्कळीत झाल्याने गेल्या ५ दिवसांत पुणे विमानतळावरून होणारी ४ ते ५ टन मालवाहतूक थांबली आहे. पुण्यातील शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी आणलेला भाजीपाला आणि फळे आता परत नेण्याची वेळ आली आहे. हवाई वाहतुकीमध्ये ७० टक्के वाटा ऑटो पार्ट्सचा असला तरी, नाशवंत मालाचे नुकसान सर्वाधिक होत आहे. त्यासोबतच द्राक्ष बागायतदारांसमोर आव्हाने पाहायला मिळत आहे. निर्यात थांबल्याने स्थानिक बाजारपेठेत द्राक्षांची आवक वाढेल, परिणामी दरांमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँकांचे कर्ज काढून बागा फुलवल्या आहेत. माल विकला न गेल्यास कर्ज कसे फेडायचे, हा प्रश्न गंभीर आहे. कोल्ड स्टोअरेजमध्ये माल ठेवण्याचा दररोजचा खर्च व्यापाऱ्यांना परवडताना दिसत नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us