
सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या या पावसामुळे पूर्व भागात ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली. बोर नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. यामुळे हजारो हेक्टरवरील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या चार दिवसांपासून जतच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. मका, तूर, बाजरी, भुईमूग यांसारख्या पिकांबरोबरच डाळिंब आणि द्राक्ष बागांचेही मोठे नुकसान झाले. यंदा पावसाला चांगली सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली होती. चांगल्या पिकांमुळे मागील वर्षांचे कर्ज फिटेल अशी आशा त्यांना होती. मात्र परतीच्या पावसाने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवले. यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत.
तसेच उमदी भागासह अनेक ठिकाणी घरांची पडझड झाल्याची माहितीही समोर आली आहे. बोर्गी आणि बालगाव येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे बोर नदी पूर्णपणे भरून वाहत आहे. ज्यामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरले असून, काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मोरबागी, गिरगाव, माणिकनाळ, सुसलाद आणि सोनलगी यांसारख्या गावांमध्येही मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. यामुळे कांदा आणि मका या पिकांना मोठा फटका बसला आहे.
या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी सरकारकडून तात्काळ मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी शेतांचे बांध फुटले आहेत, त्यामुळे माती वाहून गेली आहे आणि शेतीचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांना तातडीने सरकारी मदत द्या, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.
दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात असलेल्या सिंदखेड गावामध्ये सीना नदीला आलेल्या महापुरामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. चारही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या या गावात सुमारे दीड हजार ग्रामस्थ अडकले आहेत. प्रशासनाने सांगली आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बचाव पथकासोबत मिळून गावात पिण्याचे पाणी आणि जेवण पोहोचवले आहे. मात्र, पुराच्या भयामुळे अनेक ग्रामस्थ बोटीने सुरक्षित ठिकाणी जाण्यास तयार होत नाहीत. सीना नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावांना पाण्याचा वेढा बसलेला असून, परिस्थिती गंभीर असल्याचे दिसत आहे.