तो जिवंत राहावा म्हणून यकृत दान… मुलगा अंतिम श्वास घेत असताना आईचा मोठा निर्णय; काळजाला भेदणारी कहाणी

Mother Son Relationship: तो जिवंत राहावा म्हणून यकृत दान..., मुलगा अखेरच्या घटका मोजत असताना माऊलीने असं दिलं जीवनदान; काळजाला भिडणारी कहाणी

तो जिवंत राहावा म्हणून यकृत दान... मुलगा अंतिम श्वास घेत असताना आईचा मोठा निर्णय; काळजाला भेदणारी कहाणी
फाईल फोटो
| Updated on: May 20, 2025 | 1:52 PM

देव सर्वत्र उपस्थित राहू शकत नाही, म्हणून त्याने आईला बनवलं, हे वाक्य सांगलीतील एका घटनेला तंतोतंत लागू होतं. आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी आई स्वत:च्याही प्राणाची पर्वा करत नाही. अशाच एका जननीने तिच्या मुलाला जीवनदान दिलं आहे. सांगलीतील 20 वर्षांचा रोहन पवार हा विल्सन्स या आजारामुळे झालेल्या लिव्हर फेल्युअरच्या अंतिम टप्प्यात होता. अखेर त्याचे प्राण वाचवण्यासाठी त्याच्या आईने यकृतदान केलं आहे.

विल्सन्स हा अत्यंत दुर्मिळ आजार असून त्यामुळे शरीरात विषारी कॉपर साचतो. यामुळे रोहनची तब्येत वेगाने ढासळत होती. अशा परिस्थितीत त्याच्या आईने यकृतदान करून मुलाचे प्राण वाचवले आहेत. मुंबईतील सेंट्रल रुग्णालयात रोहनवर उपचार सुरू होते. लिव्हर ट्रास्नप्लान्ट, एचपीबी आणि जीआय सर्जन डॉ. स्वप्नील शर्मा आणि त्यांच्या टीमच्या तज्ज्ञ देखरेखीखाली तातडीने करण्यात आलेल्या तपासणीमधून यकृत प्रत्यारोपण ही रोहनला वाचविण्याचा एकमेव आशा असल्याचं निष्पन्न झालं. अशा वेळी सविता यांनी धैर्य दाखवलं.

सविता यांच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर डोनर म्हणून त्या योग्य असल्याचं निश्चित झालं होतं. आपल्या मुलाला आपल्यामुळेच जीवनदान मिळणार असल्याचा आनंद त्या माऊलीला होता. दोन आठवड्यांपूर्वी डॉ. स्वप्नील शर्मा यांनी ही अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपने पार पाडली. “मी घेतलेल्या निर्णयाचा पुन्हा विचारही केला नाही. एक आई म्हणून मला माझा मुलगा जिवंत पहायचा होता. माझ्या यकृताचा एक भाग त्याला देणं ही माझ्यासाठी अत्यंत स्वाभाविक गोष्ट होती,” अशा शब्दांत सविता यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर रोहनच्या तब्येतीत आता सुधारणा होत असून त्याच्या यकृताची क्रियासुद्धा हळूहळू पूर्ववत होत आहे. शस्त्रक्रियेनंतर प्रतिक्रिया देताना रोहन म्हणाला, “माझ्या आयुष्यावर माझ्या आईचे ऋण आहेत. तिचा खंबीरपणा आणि तिचं प्रेम यांच्यामुळे मला जगण्याची आणखी एक संधी मिळाली. तसंच हा चमत्कार शक्य करणाऱ्या डॉक्टरांचाही मी मनापासून आभारी आहे. आई माझ्यासाठी देव आहे…’ असं देखील रोहन म्हणाला.