
सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून खून, मारामारीच्या घटनांचे सत्र सुरू आहे. जिल्ह्यातील या गंभीर गुन्ह्यांमुळे गुन्हेगारांवर पोलिसांचे नियंत्रण आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच आता आणखी एक भयानक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून बाप-लेकावर हल्ला करून, मुलाच्या डोळ्यासमोरच वडिलांना दगडाने ठेचून ठार मारण्याची घटना सांगली शहरात घडली. या प्रकरणात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव कीर्तीकुमार शेडबाळे (वय ५०) असे आहे. हल्ल्यात त्यांचा मुलगा जखमी झाला आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
कीर्तीकुमार शेडबाळे हे आपल्या मुलासह दुचाकीवरून इनाम धामणी रोडजवळील कच्च्या रस्त्यावरून जात होते. तेव्हा रस्त्याच्या कडेला बसलेल्या तिघा संशयितांनी त्यांच्याशी किरकोळ कारणावरून वादावादी केली. वाद वाढल्याने संशयितांनी बाप-लेकावर हल्ला चढवला. हा वाद इतका टोकाला गेला की हल्लेखोरांनी दगडाने कीर्तीकुमार शेडबाळे यांच्या डोक्यावर वार केला. हा वार इतकी जोरात होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुलगा या हल्ल्यात जखमी झाला. मुलाच्या डोळ्यादेखत वडिलांचा असा क्रूर मृत्यू झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
संशयितांना पकडले
हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या संशयितांना संतप्त नागरिकांनी पकडले आणि बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हत्या नेमक्या कोणत्या कारणाने झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. सांगलीत सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.