अलिशान गाडीतून पळवलेला सांगलीचा 16 लाखांचा बोकड सापडला

| Updated on: Dec 28, 2020 | 6:58 PM

आटपाडीतून चोरीला गेलेला 16 लाखांचा बोकड शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे (Sangli’s Stolen goat who worth Rs 16 lakh found).

अलिशान गाडीतून पळवलेला सांगलीचा 16 लाखांचा बोकड सापडला
Follow us on

सांगली : आटपाडीतून चोरीला गेलेला 16 लाखांचा बोकड शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. तीनही आरोपी पोलिसांना कराडमध्ये बोकडासोबत सापडले. पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात ही यशस्वी कारवाई केली आहे. आटपाडीमधून 26 डिसेंबर रोजी पहाटे 16 लाखांचा बोकड चोरीला गेला होता. चोरट्यांनी अलिशान अशा वॅगनोर कारमधून बोकड पळवून नेला होता. या बोकडाला विकून पैसे कमवण्याचा हेतू चोरट्यांचा होता. अखेर चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या आरोपींचे नावे अमोल जाधव, शुभम हाके, सुदाम नलवडे अशी आहेत. तीनही आरोपी आटपाडीचे रहिवासी आहेत (Sangli’s Stolen goat who worth Rs 16 lakh found).

सांगली जिल्ह्यातील आटपाडीतील प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजारात दीड कोटी रुपये दर असलेला मोदी बकरा आणि त्याचाच वंश (Modi Bakra Sangli) असलेल्या 16 लाखाचा बोकड चर्चेचा विषय ठरला होता. त्याला आटपाडीच्या बाजारात 70 लाख रुपये इतक्या प्रचंड दराने मागणी झाली. पण तो त्यांनी विकला नाही. मात्र, त्यातील 16 लाखांचा बोकड आटपाडीच्या सोमनाथ जाधव यांनी विकत घेतला. मात्र हाच बोकड चोरीला गेला. शनिवारी पहाटे चोरांनी गोठ्यात शिरुन त्याला पळवलं. विशेष म्हणजे एका आलिशान चारचाकी गाडीतून हा बोकड लंपास करण्यात आल्याने खळबळ माजली.

मोदी बकऱ्याची राज्यभर चर्चा

सांगोल्याच्या बाबूराव मेटकरींच्या मोदी बोकडाची राज्यभर चर्चा झाली. या बोकडावर आटपाडीच्या बाजारात तब्बल 70 लाखांची बोली लागली होती. मात्र मेटकरींना तो दीड कोटींच्या खाली विकायचा नव्हता. त्यामुळं हा व्यवहार होऊ शकला नाही. याच बाजारात त्यांनी मोदी बोकडाचं बीज असलेल्या दुसऱ्या बोकडालाही आणलं होतं, हा बोकड त्यांनी 16 लाखांना विकला. जो आटपाडीच्या सोमनाथ जाधव यांनी विकत घेतला.

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात आटपाडी कार्तिक पौर्णिमेची यात्रा प्रसिद्ध आहे. येथे पशुपालक, मेंढपाळ मोठ्या संख्येने येत असतात. चालू वर्षी कोरोनामुळे यात्रा रद्द झाली. त्याऐवजी फक्त जनावरांचा बाजार रविवारी आणि सोमवारी भरविण्यात येतो. गेल्या महिन्यात मोठ्या उत्साहात हौशी मेंढपाळ पशूपालक यांनी आपल्या जनावरांसह हजेरी लावली होती. तिथंच हे दोन्ही बोकड पाहायला मिळाले होते.

बोकडासाठी 16 लाखांची किंमत काही कमी नाही. मात्र, जाधवांनी मोठ्या हौशीनं हा बोकड घेतला. मात्र, त्याच्यावर चोरट्यांची वाईट नजर पडली. बोकड शोधून देणाऱ्यांसाठी जाधव यांनी बक्षीसही ठेवले होते.

संबंधित बातमी : बारामतीत बोकड – शेळीचं लग्न, आहेर सरकारला देणार