चौकशी होणार म्हणताच संजय गायकवाड मीडियासमोर, पहिली प्रतिक्रिया काय? आता थेट मोठी मागणी…
प्रकाशक प्रशांत अंबी यांना धमकावल्याप्रकरणी कोर्टाने चौकशीची परवानगी दिल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'मी चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे,' असे सांगत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या पुस्तकांवर बंदी घालण्याची मागणी पुन्हा केली.

प्रकाशक प्रशांत अंबी यांना धमकावल्याप्रकरणी कोर्टाने शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे संजय गायकवाड यांची मोठी अडचण होणार असल्याचं सांगितलं जात आहे. गायकवाड यांच्या चौकशीमुळे शिंदे गटही अडचणीत येणार असल्याची शक्यता आहे. मात्र, कोर्टाचा निर्णय येताच संजय गायकवाड यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही, असं म्हणत शिवाजी कोण होता? या पुस्तकावर बंदी आणण्याच्या मागणीचा गायकवाड यांनी पुनरुच्चारही केला आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपतींचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल जी काही मी शिवीगाळ केली होती, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली आहे. यापुढेही शिवरायांचा अपमान करणाऱ्याचा विषय असेल तर मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात दगलबाज शिवाजी, शिवाजी शिवाजी कोण होता? या पुस्तकांवर बंदी आणण्याकरता मी मुख्यमंत्र्यांकडे आग्रही असणार आहे. याविषयी न्यायालयाने जे काही आदेश दिले असतील, पोलिसांना सहकार्य करण्यास मी तयार आहे, असं संजय गायकवाड म्हणाले.
मर्डरचा गुन्हा केला नाही
न्यायालयाचा आदर करून मी चौकशीला सामोरे जाणार आहे. त्या पुस्तकात 135 वेळा छत्रपतींचा अपमान केला आहे. तो आम्ही सहन करणार नाही. मी पोलिसांना मदत करणार आहे. मी काही मर्डरचा गुन्हा केला नाही. मला अद्याप पोलिसांची नोटीस आली नाही. माझे महाराष्ट्र भर समर्थक आहेत अशा अज्ञात समर्थकांकडून प्रशांत आम्ही धमक्या दिल्या जात असतील. त्यांच्या भावना भडकत असतील तर त्याला मी काही करू शकत नाही, असं सांगतानाच माझ्यावर दखलपात्र गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असं संजय गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
इंधन तुटवडा नाहीच
यावेळी त्यांनी इंधन तुटवड्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्यात कुठेही पेट्रोल डिझेलचा तुटवडा नाही. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे साठेबाजी वाढली आहे, असं त्यांनी सांगितलं. इंधन टंचाईला देशातील कोणताही पक्ष जबाबदार नाही. तर जागतिक युद्धजन्य परिस्थितीच याला कारणीभूत आहे, असा दावाही त्यांनी केला.
नैसर्गिक शेती करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नैसर्गिक शेतीसाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. रासायनिक शेतीमुळे आपल्या सर्वांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. भविष्यात नैसर्गिक शेतीचाच काळ येणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.