Sanjay Raut: संजय राऊत शिवसेनेत एकाकी?, राष्ट्रपतीपदाच्या पाठिंब्याच्या निमित्ताने प्रकर्षाने आले समोर?

| Updated on: Jul 12, 2022 | 6:03 PM

संजय राऊत सातत्याने बंडखोर आमदार आणि भाजपावर टीका करत असताना शिवसेनेच्या अनेक खासदारांची भूमिका ही राऊतांच्या भूमिकेपेक्षा भिन्न आहे. त्यामुळेच ते पक्षात आणि खासदारात एकटे पडले आहेत का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

Sanjay Raut: संजय राऊत शिवसेनेत एकाकी?, राष्ट्रपतीपदाच्या पाठिंब्याच्या निमित्ताने प्रकर्षाने आले समोर?
Shiv Sena MP Sanjay Raut
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई – एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बंडखोर आमदारांच्या टार्गेटवर असलेले शिवसेना खासदार संजय राऊत  (Sanjay Raut)आता खासदारांतही एकाकी पडतायेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सोमवारी शिवसेना खासदारांच्या झालेल्या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीत (President Election) एनडीएच्या द्रौपदी मर्मु यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी शिवसेना खासदारांनी केली. या बैठकीपूर्वी शिवसेना विरोधकांनी पाठिंबा दिलेल्या यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देईल, अशी चर्चा होती. मात्र बैठकीत खासदारांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा आग्रह धरल्याची माहिती आहे. त्यानंतर याबाबतचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) घेतील असे संजय राऊत यांनी सांगितले. दरम्यान या बैठकीनंतर ते निघून गेले होते आणि नाराज होते, अशी चर्चाही सुरु झाली होती, मात्र असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र खासदारांनी द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा देण्याच्या भूमिकेसोबतच एकनाथ शिंदे गटाशी जुळवून घ्यावे, अशी मागणीही या बैठकीत केल्याचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले आहे. संजय राऊत सातत्याने बंडखोर आमदार आणि भाजपावर टीका करत असताना शिवसेनेच्या अनेक खासदारांची भूमिका ही राऊतांच्या भूमिकेपेक्षा भिन्न आहे. त्यामुळेच ते पक्षात आणि खासदारात एकटे पडले आहेत का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

मुर्मुंना पाठिंबा म्हणजे भाजपाला पाठिंबा नाही

शिवसेनेच्या खासदारांनी केलेल्या मागणीनुसार शिवसेनेने एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा देण्याचा निर्णय अखेरीस मंगळवारी जाहीर केला. मात्र त्यांना पाठिंबा म्हणजे भाजपाला पाठिंबा नव्हे असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. शिवसेनेच्या खासदारांच्या मागमीनुसारच हा निर्णय घेण्यात आला, असेही सांगण्यात आले आहे. शिवसेनेने हा निर्णय घेतला नसता तर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना खासदारांमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. शिंदे गट आणि भाजपाच्या संपर्कात १० ते १२ खासदार असल्याचे भाजपा नेते आणि शिंदे गटातील नेते सांगत आहेत. त्यामुळेच ही फूट पडू नये, तुर्तास हे संकट टळावे, त्यामुळे मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

राऊतांना शिवसेना संपवायची आहे, बंडखोर आमदारांची टीका

संजय राऊत ज्या प्रकाराची वक्तव्ये करत आहेत, त्यातून त्यांनी शिवसेना संपवायची सुपारी घेतली आहे, असा आरोप आज पुन्हा एकदा संजय शिरसाट यांनी केला आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी याची योग्य वेळी दखल घ्यावी, असेही त्यांनी सांगितले आहे. बंडखोर सातत्याने ठाकरेंवर टीका न करता संजय राऊत यांच्यावर टीका करताना दिसत आहेत.